महिलेची अशीही खोटी क्राईम स्टोरी... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

चार तरुण एक महिला भाड्याने घर हवे असल्याचे सांगत घरात आले, पाणी मागितले, पैकी एकाने मागून डोक्‍यात काहीतरी मारल्याने भोवळ आली. मग त्यांनी मला विवस्त्र करून फोटो काढले आणि पोलिसांना तक्रार केली तर, फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची हकिगत तक्रारीत नोंदवण्यात आली होती. 

जळगाव : मकरसंक्रांतीच्या दिवशी (15 जानेवारी) गणपतीनगरातील उच्चभ्रू कुटुंबातील 35 वर्षीय विवाहितेला विवस्त्र करून चार लाख रुपये रोख, सोने-चांदीचे दागिने व प्रॉपर्टींचे दस्तऐवज लुटून नेल्याची घटना घडली होती. दोन दिवसानंतर शुक्रवारी (ता. 17) या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याबाबत तक्रारदार महिलेने दिलेली नाटकीय फिर्याद व गुन्ह्याची हकिगत ऐकून अख्खे पोलिसदल चक्रावून गेले होते. सहा दिवस या महिलेवर पाळत ठेवून गुन्हे शाखेने या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, तक्रारदार महिलेनेच हा सर्व बनाव केल्याचे पोलिस अधीक्षकासमक्ष कबूल केले आहे. 

क्‍लिक करा - जन्मदात्या आईचा केला छळ...अन्‌ झाली प्रवेश बंदी

गणपतीनगरात वास्तव्यास असलेल्या चटई उद्योजकाच्या पत्नीला विवस्त्र करून घरातून 5 लाखांचे सोने, 40 हजार रोख आणि सासऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनीचे दस्तऐवज बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना मकरसंक्रांतीच्या दुपारी घडली होती. घडला प्रकार विचित्र असल्याने व इभ्रतीला घाबरून या कुटुंबीयांनी तक्रार दिली नाही. मात्र, तिच्याच वडिलांनी तक्रार देण्यास सांगितल्यावर गुन्हा दाखल झाला. मुळात कुठलीच घटना घडलेली नसताना चार तरुण एक महिला भाड्याने घर हवे असल्याचे सांगत घरात आले, पाणी मागितले, पैकी एकाने मागून डोक्‍यात काहीतरी मारल्याने भोवळ आली. मग त्यांनी मला विवस्त्र करून फोटो काढले आणि पोलिसांना तक्रार केली तर, फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची हकिगत तक्रारीत नोंदवण्यात आली होती. 

कौटुंबिक हेवेदाव्यातून प्रकार 
तक्रारदार महिलेच्या पतीचा एमआयडीसीत चटई कारखाना आहे. मूलबाळ नसल्याने ही महिला मानसिक त्रासात होती. चटई उद्योग, पारंपरिक जंगम प्रॉपर्टीतून अंतर्गत शितकलह सुरू होता. त्यातूनच दिवसभर टीव्हीवर क्राईम स्टोरीज असणाऱ्या सिरिअल्स बघून या महिलेने न घडलेल्या गुन्ह्याची कथा रचली. गुन्हा दाखल झाल्यावर चक्रावलेल्या पोलिसांच्या डोक्‍यात शंकेची पाल चुकचुकली व त्यांनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबीयांवरच पाळत ठेवून गुन्ह्याची उकल केली आहे. 

दागिन्यांची कबुली नाहीच 
घडल्या प्रकाराचा आपण बनाव केल्याचा जबाब उद्योजकाच्या पत्नीने दिला असून, पाच लाखांचे सोने व रोकड आपण घरासमोरील कचराकुंडीत फेकून दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत महिला अधिकाऱ्यांनी विचारपूस केल्यावर या महिलेला पतीच्या स्वाधीन करण्यात आले असून, उर्वरित तपासाला उद्या सुरवात होणार आहे. 

..कचरा कुंडीत फाइल फेकताना 
गेले सहा दिवस घडलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू होता. गुन्हा उघडकीस येण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांनी तपासात झोकून देत प्रत्येक विषयावर लक्ष केंद्रित केले होते. गुन्हेशाखेच्या पथकाने गावठी पद्धतीने या महिलेच्या घराबाहेरच 24 तास पाळत ठेवली होती. चोरीला न गेलेल्या फाइल घरात सापडल्या तर आपल्यावरच शंका नको म्हणून त्या फाइल आज तक्रारदार महिलाच स्वत:च अपार्टमेंटच्या खालील डस्टबीनमध्ये टाकताना सापडली. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्या फाइल ताब्यात घेतल्यावर आज त्या महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. विचारपूस केल्यावर ती टाळाटाळ करीत असल्यावर फाइल फेकतांनाचे चित्रण दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon women crime story froad familly mater