Women's Day : आधी वकिली, आता सभापतिपदाचा  शुचिताजी सांभाळताहेत यशस्वी धुरा ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

राजकारणाचे बाळकडू लहानपणी आईकडून मिळाले. उच्च शिक्षण घेण्यापासून ते कोणतीही गोष्ट अभ्यासूवृत्तीतून समजून घेण्याची त्यांची वृत्ती कायम ठेवली. सुरवातीला वकिली यशस्वीपणे सांभाळत आता ऍड. शुचिता हाडा या थेट जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाचा धुरा हाती घेऊन यशस्वीपणे सांभाळत आहे त्याविषयी... 

 

जळगावः शुचिताजींचे मूळ गाव धरणगाव. कुटुंबात मोठी बहीण आणि भाऊ असे कुटुंब. वडील (रवींद्र जैन ) गर्व्हमेंट सिव्हिल क्रॉन्ट्रॅक्‍टर, तर आई (निर्मला जैन) धरणगाव पंचायत समितीत नगरसेविकेपासून विविध पदांवर विराजमान अशी राजकीय वारसा त्यांना होता. दहावी बारावीच्या शिक्षणानंतर बीएसएसएल एलएलबी शिक्षण जळगावात येऊन पूर्ण केले. ऍडव्होकेट 
ही पदवी संपादन करत वकिलीची प्रॅक्‍टिस केली. नाशिक येथून डिप्लोमा इन फॉरेन्सिक मेडिसीन ऍण्ड मीडिया ज्युरिसपीडीयन्स हा कोर्स पूर्ण केला. लग्नानंतर पतीच्या सहकार्याने राजकारणात पर्दापण केले. आणि त्या आज स्थायी समितीच्या पदापर्यंत जाऊन अभ्यासवृत्तीचा एक वेगळा ठसा त्यांनी जळगाव महापालिकेच्या राजकारणात उमटविला आहे. 

महिलांसाठी अत्याधुनिक शौचालयाचा मानस 
शहरात महिला शौचालय नसल्याने महिलांची कुचंबणा होते. त्यामुळे महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह 
उभारण्याच्या हालचाली सभापती ऍड. शुचिता हाडांनी सुरू केल्या आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी "पे ऍण्ड यूज' या तत्त्वावर हे स्वच्छतागृह उभारण्यात येईल. विशेष म्हणजे स्वच्छतागृहात सॅनिटरी वेडिंग आणि डिस्पोझेबल मशिनची व्यवस्था असणार आहे. याकरिता शहरातील 8 ते 9 ठिकाणी स्वयंसेवी संस्थांकडून शौचालय उभारले जाणार आहे. 

मनपाचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर 
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, मात्र महापालिका मालकीच्या जागा पडून आहे. त्यानुसार सभापतींनी रेडक्रॉस सोसायटी जवळील, शामरावनगरातील जागेचा होणारा दुरुपयोग लक्षात घेऊन जागा ताब्यात घेतली. शहरातील अशा अनेक जागांचा शोध घेऊन महापालिकेच्या उत्पन्नात भर पाडण्याचा प्रयत्न त्या करीत आहे. 

"रस्ता दुरुस्तीसाठी' तरतूद करणार 
रस्त्यांबाबात शुचिता हाडा म्हणाल्या, जळगावकर खूप सोशिक आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्याची मला खंत आहे. मात्र एका चांगल्या गोष्टीसाठी काही काळाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अमृतचे काम सुरू आहे, त्यामुळे खड्डे हे होणारच आहेत. पण ते लागलीच बुजवायला हवेत. यंदाच्या अर्थसंकल्पात "रस्ता दुरुस्तीसाठी...' या मथळ्याखाली तरतूद करणार आहे. जेणेकरून कायमस्वरूपी रस्ता दुरुस्तीसाठी निधी राहील. असेही त्यांनी सांगितले. 

दर आठवड्याला सभेचा पायंडा 
दर आठवड्याला एक स्थायी समितीची सभा होण्याचा पायंडा सभापती ऍड. हाडांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरू केला. आतापर्यंत 14 सभा झाल्या त्यातील सर्व ठराव एकमताने झाले. प्रतिकूल मतांची आकडेवारी शून्य असून सभेत सांगोपांग चर्चेतून सर्वांचे ऐकून घेणे. त्यानंतर निर्णय घेतले जातात. तसेच शहराच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधीपक्षाने एकत्र काम करावे अशी त्यांची इच्छा आहे. 

माहेर, सासरकडून राजकीय बाळकडू 
सभापती ऍड. शुचिता हाडांना बाळकडू लहानपणी त्याच्या आईकडून होतेच. अतुलजी हाडा हे विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय होते. त्यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर ऍड. शुचिता हाडा यांना दोन्हीकडून राजकारणाचे धडे मिळाले होते. 2013 ला महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी त्या उभ्या राहिल्या व निवडून आल्या. तसेच विरोधीपक्षात असताना सत्ताधाऱ्यांवर मुद्देसुद टीका करून तसेच महापालिकेच्या हितासाठी विविध ठराव व सूचना मांडून त्यांनी अभ्यासू सदस्य म्हणून ओळख निर्माण केली होती. आता सत्तेत असताना स्थायी समितीचे पद मिळाल्यानंतर त्यांनी महापालिकेत कामाचा धडाका सुरू करून आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. 

मेहरुण तलाव करणार विकसित 
जळगाव शहराचे निसर्ग संपत्ती म्हणून मेहरुण तलाव आहे. तलाव परिसरात बीओटी तत्त्वावर बोटॅनिकल, बटरफ्लाय गार्डन तयार केले जाणार आहे. यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच मेहरुण तलाव हे निसर्ग संपन्न करण्याचा मानस सभापती ऍड. हाडा यांनी व्यक्‍त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Women's Day jmc Chairman of the Standing Committee shuchita hada Interview