जागतिक कुटुंब दिन : बावीस सदस्यांचा गोतावळा एकच छत...तरीही आनंदी आनंद

संजय पाटील
Friday, 15 May 2020

आजी, आजोबा, काकू, काका, चुलत भावंडे असा भलामोठा गोतावळा एकत्र पहावयास मिळत नाही. अशा परिस्थितीत येथील २२ सदस्यांचे क्षत्रिय कुटुंब हे आदर्श ठरत असून समाजासाठी रोल मॉडेल ठरत आहे.

पारोळा : मनाला भुरळ घालणारे आधुनिक व सोशल मिडीयाच्या युगात विभक्त कुटुंबाचा नवा ट्रेड जिकडे- तिकडे पहावयास मिळतो. लहान कुटुंबे सुखी कुटुंबे अशी लालसी वृत्तीतुन स्वतंत्र राहण्याची स्वार्थी वृत्तीही आजकाळ बळावताना दिसते. त्यामुळे आजी, आजोबा, काकू, काका, चुलत भावंडे असा भलामोठा गोतावळा एकत्र पहावयास मिळत नाही. अशा परिस्थितीत येथील २२ सदस्यांचे क्षत्रिय कुटुंब हे आदर्श ठरत असून समाजासाठी रोल मॉडेल ठरत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मोठे कुटुंब ही सुखी राहु शकते. याचे जिवंत उदाहरण क्षत्रिय परिवाराचे अभिमानाने सांगता येईल. 

लक्ष्मणसा श्रीधरसा क्षत्रिय व कुसुमबाई लक्ष्मणसा क्षत्रिय यांना चार मुले तीन मुली असा परिवार आहे. जनसामान्याची आपल्या हातुन सेवा व्हावी, मुलांनी शिक्षणातून नोकरीकडे न वळता स्वत: यशस्वी उद्योजक म्हणून समाजात भरारी घ्यावी. या भावनेपोटी लक्ष्मणसा क्षत्रिय यांनी कापड व्यवसायातून सुरवात केली. मोठा मुलगा केशव क्षत्रिय, अमृत क्षत्रीय, मोहन क्षत्रिय व धर्मेंद्र क्षत्रिय यांचा समावेश आहे. प्रातकाल वडिलांचे चरणस्पर्श करून आपल्या कार्याला प्रारंभ करणारे क्षत्रिय परिवारातील भावंडे यांचा समविचार यांच्यामुळे व एकत्रित कुटुंब राहिल्याने आज अमृत गृप म्हणून त्यांची ओळख दोन जिल्ह्यात उंचावली आहे. पर्यायाने कापड व्यवसायातून शहरात दोन, तर एरंडोल, शिरपूर व धुळे येथे अमृत कलेक्शनच्या चार शाखा कार्यरत असल्याने हजारो ग्राहकांना ते सेवा देत असल्याने ग्राहकही त्यांच्या कार्याबाबत नेहमी समाधान व्यक्त करताना दिसत असल्याने शहरात क्षत्रिय परिवाराने लौकिक मिळविला आहे. सर्वच भावंडे अमृत कलेक्शनच्या छताखाली रेडीमेड, सूटिंग शर्टिंग, साडी व ड्रेस मटेरियल अशा अनेक विभागात काम करीत असल्याने आज त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक कामगाराची कुटुंब उदरनिर्वाह करीत आहे. 

सामाजिक कार्यात नेहमीच क्षत्रिय परिवाराचा सिंहाचा वाटा 
शहरासह जिल्ह्यात समाजाचे अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. यात येथील क्षत्रिय परिवाराचा नेहमीच सिंहाचा वाटा असतो. तसेच शहरात विविध सामाजिक संस्था तसेच शासकीय व खाजगी स्तरावरील कार्यात परिवाराचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. लक्ष्मणसा क्षत्रियकडून समाजसेवेचे बाळकडू घेतले केशव क्षत्रिय व त्यांची भावंडे यांच्यातील प्रगतीची एकजूट कौतुकास्पद आहे. याबरोबर क्षत्रिय परिवाराची तिसरी पिढी यांचेही शैक्षणिक व सामाजिक कार्यात योगदान नोंद घेण्यासारखे आहे. प्रफुल्ल क्षत्रिय, दीपाली क्षत्रिय, भाग्यश्री क्षत्रिय हे उच्च शिक्षण घेत परिवाराचे स्वप्न साकार करीत आहे. दरम्यान व्यवसाय वृद्धीत परिवारातील महिला ही काही काळ वेळ देत असल्याने सर्वांच्या सहकार्याने क्षत्रिय परिवाराची वाटचाल यशोशिखर गाठताना दिसत आहे. 

एकत्र कुटुंब प्रगतीचा आलेख 
आजकाल नवीन पिढीला एकत्र कुटुंब पद्धतीचा ट्रेड नकोसा वाटतो. मात्र, एकत्रित पणाला ममतेचा आधार असतो. आजी, आजोबा यांच्या हातचे जेवण, त्यांच्या बालपणातील गोष्टी किंवा खडतर प्रवासातून यशाचा मार्गाचे रहस्य यातून नक्कीच युवांना प्रेरणा मिळत असते. एकत्र कुटुंबात दु:ख वाटले जाते. पर्यायाने सुखी राहण्याचा मुलमंत्रही मिळतो. सामाजिक प्रतिष्ठा व आर्थिक उन्नतीचा मार्ग नेहमीच जीवनाला सुख देत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon world family day 22 member one house