world kidney day : उच्चरक्‍तदाब, मधुमेहींना जडतोय किडनीचा विकार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 March 2020

किडनीच्या विकाराबाबत आजही पुरेशी जनजागृती नाही. यामुळे आजार अंतिम टप्प्यात आलेला असताना रूग्ण तपासणीसाठी येतात. शिवाय, अवयव दानाबाबत अजूनही पुरेशी जनजागृती नसल्याने किडनी मिळणे कठीण होत असते. यामुळे अवयवदानाचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. 
- डॉ. अभय जोशी, किडनीरोग तज्ज्ञ 

जळगाव : शरीरातील अशुद्धी बाहेर टाकण्याचे काम मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, किडनीबाबत योग्य काळजी घेतली जात नसल्याने मूत्रपिंडाचे विकार जडतात. विशेष म्हणजे, अनेकांना शेवटच्या टप्प्यात आजार आल्यानंतर ते देखील तपासणी दरम्यान किडनीचा विकार झाल्याचे लक्षात येते. या प्रामुख्याने उच्चरक्तदाब व मधुमेहींची संख्या जास्त आहे. किडनीचा विकार होण्याचे प्रमाण हे आठ ते दहा टक्‍के झाले आहे. 

क्‍लिक करा - कोरोनाला रोखण्यसाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज; जबाबदारी निश्‍चित

किडनी अवयव शरीराचे एक महत्त्वाचे अंग. मणक्‍याच्या दोन्ही बाजूंना कमरेच्या थोड्या वरच्या बाजूला असतो. गाळणीप्रमाणे किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाजूला करते. रक्तशुद्धीकरणाबरोबर शरीरातील क्षारांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम किडनी करत असते. परंतु, शरीरातील या महत्त्वाच्या अवयवाबाबत आजही लक्ष दिले जात नाही. यामुळे किडनीचे आजार होतात. विशेष म्हणजे, आजाराच्या लक्षणांबाबत पुरेशी माहिती नसल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते आणि आजार अंतिम टप्प्यात येऊन पोहचलेला असतो. 

...अशी आहेत लक्षणे 
किडनी विकाराच्या कारणांमध्ये स्मोकिंग, दारू पिणे हे कारण असले, तरी याशिवाय मुतखडा, मधुमेह (डायबिटीस), उच्च रक्तदाब, शरीरात पाणी व क्षारांचे प्रमाण वाढल्याने सूज येणे, यासारख्या कारणांमुळे किडनीवर परिणाम होतो. यामुळे लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा लघवी अडकणे यासारखी लक्षणे आढळून आल्यास लागलीच उपचार करण्यास जायला हवे. 

...अशी घ्या काळजी 
किडनीच्या आजारांवर उपचार उपलब्ध आहेत. दोन्ही मूत्रपिंडांचे काम करणे बंद झाल्यास म्हणजे किडनी निकामी झाल्यास डायलिसिस हा एकमेव पर्याय आहे. आजार शेवटच्या टप्प्यात आल्याने डायलिसिस करावे लागत असल्याने साधारण 20 टक्‍के रुग्ण अशा प्रकारचे आढळून येतात. परंतु विकार टाळण्यासाठी नियमित तपासणी, भरपूर पाणी पिऊन शरीरातील पाणी मेंटेन ठेवणे, वेदनाशामक गोळ्या घेणे टाळणे, धूम्रपान- मद्यपान टाळणे, रक्तदाब- डायबेटीस असल्यास नियंत्रित ठेवणे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon world kidney day ten percentage patient kidney problem