कोरोनाला रोखण्यसाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज; जबाबदारी निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता, त्यावर तात्काळ नियंत्रण ठेवून उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

जळगाव : चीनसह भारतात कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले असून पोलिस, महसूल, आरोग्य विभागासह महापालिकेला त्यांची जबाबदारी निश्‍चित करुन देण्यात आली आहे. 

क्‍लिक करा - करवसुलीसाठी ‘महावितरण’-‘महसूल’मध्ये राडा 

आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता, त्यावर तात्काळ नियंत्रण ठेवून उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. यासाठी मार्गदर्शन सुचनेनुसार तातडीची उपाययोजना करणेकामी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडावयाची जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.

हेपण पहा - भोंदूबाबाचा प्रताप...पूजेसाठी बोलावले...मग केली अश्‍लिल व्हिडीओ क्‍लिप!
 
तर कारवाई करा 
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी खाजगी डॉक्‍टरांची सेवा अधिग्रहीत करणे. तसेच खाजगी हॉस्पीटल मधील साधनसामुग्री अधिग्रहीत करण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत. या कामात कोणीही खाजगी रुग्णालये सहकार्य करीत नसतील, तर त्यांचेवर योग्य ती कारवाई करावी. आपल्या अधिनिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करावे, आवश्‍यक तो औषधसाठा उपलब्ध करावा. 

गृह विभाग 
पोलीस अधिक्षक,- कोरोना विषयी समाजात अफवा पसरविणाऱ्यांवर सायबरसेलच्या माध्यामातून नियंत्रण ठेवणे. गर्दीच्या ठिकाणी आवश्‍यक ती जनजागृती करणे, परदेशीय नागरीक अथवा परदेशातून प्रवास करून आलेले आलेले भारतीय नागरिकांसदर्भात नजिकच्या पोलीस स्टेशनच्या प्रभारींकडून माहिती घेणे, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक यांना सदर कार्यक्रम आयोजित करु नये अथवा पुढे ढकलणेबाबत अवगत करुन जिल्हा रुग्णालयाशी समन्वय ठेवणे. 

आरोग्य विभाग 
जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता लघूकृती प्रमाणित कार्यपध्दती तयार करणे, आरोग्य विषयक माहिती पुस्तीकेचे वितरण, वैद्यकीय पथके तयार करणे, 24 तास सेवा उपलब्ध करून देणे. तसेच कोरोनाच्या रुग्णांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे, औषध विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणे, झींगल्स, हस्तपत्रीका, पोस्टर्स, स्टीकर इत्यादिंच्या माध्यमातून जनजागृती करणे. 

महानगरपालिका 
आयुक्त, मुख्याधिकारी यांनी त्यांच्या अख्त्यारीत असलेल्या रुग्णांमध्ये जनजागृती करन स्वच्छतेबाबत आढावा घ्यावा. स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करुन त्यांची पूर्णवेळ नियुक्ती करावी. 

जिल्हा परिषद 
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत जनजागृती, नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या, अंगणवाडी व शाळांमध्ये प्रबोधन करावे. 

महसूल विभाग 
सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती, सर्व यंत्रणांशी समन्वय व नियंत्रण, विविध संस्था, संघटना व व्यक्तींकडून प्राप्त मदतीने परदेशी नागरिकांची माहिती संकलीत करुन ती जिल्हा रुग्णालयास कळवावी. 

अन्न व औषध प्रशासन विभाग 
सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेते यांनी जास्त भावाने मास्क विक्री औषधांची साठेबाजी, संसर्गाबाबत चुकीचे समज पसरवणाऱ्यांची तात्काळ माहिती देवून औषध विक्री दुकानांची तपासणी करणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona virus jalgaon Disaster management ready Responsibility every department