esakal | Video : "लॉकडाउन'च्या निवांत क्षणी खंडकाव्याचे लेखन

बोलून बातमी शोधा

prof. Dr.  M. S. Pagare

मानवतावादाच्या अनुषंगाने एक खंडकाव्याचे लेखन सध्या सुरू असल्याचे प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी "सकाळ'शी भ्रमणध्वनीवर दिलखुलास गप्पा मारताना सांगितले

Video : "लॉकडाउन'च्या निवांत क्षणी खंडकाव्याचे लेखन
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

 जळगाव : सध्या "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन'चा भयानक काळ सुरू आहे. बऱ्याच दिवसांनी मिळालेल्या या निवांत काळात पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञान पुस्तकांच्या माध्यमातून कार्ल्स, हेगेल, सॉक्रेटिस, ऍरिस्टॉटल आदी तत्त्ववेत्त्यांचा जो गाभा आहे त्याची मांडणी असलेली पुस्तके व इतर देशातील तत्त्ववेत्ते यांचे तुलनात्मक वाचन सुरू आहे. यासोबतच मानवतावादाच्या अनुषंगाने एक खंडकाव्याचे लेखन सध्या सुरू असल्याचे प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी "सकाळ'शी भ्रमणध्वनीवर दिलखुलास गप्पा मारताना सांगितले. 

डॉ. पगारे पुढे म्हणाले, की जगभरात कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराने प्रचंड थैमान माजवले आहे. यावर जगभरात कुठेही कोणतीही प्रतिबंधात्मक लस सापडत नसून यावर एकमेव "फिजिकल डिस्टन्सिंग'चा पर्याय असल्याचेही ते यावेळी म्हणाले. नागरिकांनी "लॉकडाउन'मध्ये मानसिक संतुलन टिकून राहावे, यासाठी वाचनावर भर द्यावयास हवे, असेही सांगितले.

 
"इंटरनेट'द्वारे कोरोनाची माहिती 
इंटरनेटच्या माध्यमातून जागतिक पातळीवर "कोरोना'ची काय स्थिती आहे, याबाबत माहिती जाणून घेणे, जगात आर्थिक, आरोग्य आदींच्या बाबतीत अनेक बलाढ्य राष्ट्र असूनही त्यांना कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी अपयशी येत असून, भारतात काय उपाययोजना करता येऊ शकतात, यावरही सतत मनन, चिंतन सुरू असते. 

करमणूक म्हणून सिनेमा पाहतो 
"लॉकडाउन'च्या काळात खंडकाव्य लेखन सुरू असून, लिखाण करतेवेळी मनाला थोडी करमणूक म्हणून कधीकधी लेखन बाजूला सारून जगविख्यात असलेले सिनेमे बघत असतो. 

वाचनावर अधिक भर 
"लॉकडाउन'च्या मोकळ्या वेळेत पुस्तक वाचनास महत्त्व देत असून, आजपर्यंत विविध विषयांचे जवळपास 70 ते 80 तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचून झाली आहेत. यासोबतच त्यांच्यावर चिंतन व मननही करून दिवसभर मी स्वतःला व्यस्त ठेवून आहे. मी प्रकाशित केलेली महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकेही पुन्हा एकदा वाचून काढली.