जि. प. इमारतीवर आता सीसीटीव्हीचा डोळा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

जिल्हापरिषदेच्या इमारत परिसराचा वेश्‍या व्यवसायासाठी वापर होत असल्याची माहिती "सकाळ' प्रतिनिधींकडे चार नोव्हेंबरला प्राप्त झाली होती. केळकर मार्केट येथे पावभाजीच्या गाडीवर या गंभीर विषयाचा उलगडा झाल्यावर त्या दिवसापासून पाठपुरावा सुरू होता.

जळगाव : जिल्हापरिषद जुन्या इमारतीच्या आवारात रात्री सर्रास वेश्‍याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार "सकाळ'ने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणल्यानंतर जिल्हापरिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पदाधिकारी सदस्य आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांसह प्रत्येकाच्या चर्चेत दिवसभर हा विषय सुरू होता. या गंभीर प्रकारच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दोन्ही इमारतींच्या आवारात तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह दिवस-रात्र दोन्ही शिफ्टमध्ये प्रत्येकी सहा सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. 

संबंधीत बातमी -  जि. प. इमारतीत रात्री भरतो वासनेचा बाजार 

जिल्हापरिषदेच्या इमारत परिसराचा वेश्‍या व्यवसायासाठी वापर होत असल्याची माहिती "सकाळ' प्रतिनिधींकडे चार नोव्हेंबरला प्राप्त झाली होती. केळकर मार्केट येथे पावभाजीच्या गाडीवर या गंभीर विषयाचा उलगडा झाल्यावर त्या दिवसापासून पाठपुरावा सुरू होता. याबाबत शहर पोलिसांनाही कळवण्यात आले, मात्र त्यांनी एका महिलेला पोलिस ठाण्यात उचलून नेत रात्री उशिरा सोडून दिले. तद्‌नंतर मात्र बातमीतूनच हे प्रकरण उघडकीस आणायचा निर्णय घेऊन पाळत ठेवण्यात आली होती. बुधवारी मध्यरात्री कुठलीही तमा न बाळगता थेट दुचाकीच घेत "स्पाय कॅमेरा'तून या प्रकरणाचा भांडाफोड करण्यात आला. 

"सकाळ'ची चर्चा 
"सकाळ'मध्ये गुरुवारी हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर जि. प. वर्तुळातील प्रत्येकच दालनात "सकाळ'चे वाचन सुरू होते. व्हॉटस्‌ऍपवर बातमीचे कात्रण दुपारपर्यंत सर्वत्र व्हायरल होऊन अनेकांनी आपल्या गंभीर प्रतिक्रिया नोंदवल्या. जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती, पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लक्ष घालण्याबाबत सूचना केली. आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी वृत्त वाचताच थेट सीईओंचे दालन गाठत विचारणा केली. 

प्रशासनाकडून दखल 
"सकाळ'च्या स्टिंग ऑपरेशनद्वारे हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले असून, जिल्हापरिषदेच्या नव्या व जुन्या अशा दोन्ही इमारतींच्या प्रवेशद्वारावर रात्री कुलूप लावण्यात येईल. तसेच दोन्ही इमारत परिसरात दिवस-रात्र अशा शिफ्टमध्ये सुरक्षारक्षक नेमून संपूर्ण परिसर कव्हर होईल, अशी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

या प्रकरणाबाबत जि.प. प्रशासनाकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. इमारतीलगत काही फर्म असून, त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची तपासणी करून पोलिसांत तक्रार देण्यात येईल. 
- डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon zilha parishad cctv camera sakal news impact