जनतेचा जाहीरनामा-नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला "रेड सिग्नल'च 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

   

   
     उद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने वैद्यकीय क्षेत्रातही आगेकूच केली आहे. असे असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा प्रस्ताव अजूनही शासनदरबारी प्रलंबित आहे. जिल्हानजीकच्या कमी लोकसंख्येच्या शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळते; परंतु नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय केवळ राजकीय उदासीनतेमुळे मंजूर होऊ शकलेले नाही. नाशिकचे पालकत्व सांभाळणाऱ्या जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून लाल फीत हटविणे अपेक्षित असताना त्यांनीदेखील दुर्लक्ष केले. 

   शहराची लोकसंख्या वीस, तर जिल्ह्याची लोकसंख्या 62 लाखांवर पोचली आहे. उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राज्यात नाशिकची ओळख उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रात निर्माण होते आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मुंबई-पुण्यानंतर नाशिकचा नामोल्लेख होतो. आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि राज्यात मोजकेच असलेले संदर्भसेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलही नाशिकमध्ये आहे. केंद्र शासनाचा "कायाकल्प'चा सन्मान नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयाला सलग दोन वर्षे प्राप्त झाला आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पोषक वातावरण असताना, नाशिक अद्याप शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून कोसो दूर आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्रीही आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील आशा पल्लवित झाल्या. 

अद्याप प्रस्तावाला हिरवा कंदील मिळू शकला नाही. राजकीय उदासीनता याहीवेळी आड येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने गरजूंना आरोग्याच्या सोयी-सुविधांना मुकावे लागते. वैद्यकीय पदवी घेतलेल्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी नाशिकबाहेर जाणे परवडत नाही. परिणामी अनेकांना नाशिकमध्येच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात होण्यासाठीच्या स्वप्नांना विनाकारण बगल द्यावी लागते. "विकासा'च्या नावाची हाक देत मतांचा जोगवा मागणाऱ्यांनीही नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीवरून नाशिककरांच्या तोंडाला पानेच पुसल्याची भावना निर्माण झाली आहे. 

"दत्तक' नाशिकवर हेतुपुरस्सर दुजाभाव? 

नाशिकमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असावे, ही जुनी मागणी अद्याप मान्य झाली नाही. केंद्र सरकारतर्फे अर्थसंकल्पात नायपर संस्था महाराष्ट्रात उभारण्याची घोषणा केली होती. औषधनिर्माणशास्त्र शाखेतील संशोधनासाठी हवामान व अन्य विविध अंगाने नाशिक सर्वोत्कृष्ट ठिकाण असताना नायपर संस्था नागपूरला पळविण्यात आली. वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्तावदेखील दीर्घ कालावधीपासून रखडला असून, मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकसोबत होणारा हा दुजाभाव हेतुपुरस्सररीत्या केला जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news janta jahirnama