अवकाळी पावसामुळे शेती पिकांवर आली अवकळा ! 

जगन्नाथ पाटील   
Wednesday, 16 December 2020

अवकाळी पावसाने अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. आणखी दोन-तीन दिवस हे वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

कापडणे : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शिंदखेडा तालुक्यातील वर्षी, दभाषी, दत्ताणे, गव्हाणे, कमखेडे, खलाणे, सुकवद, हुंबर्डे, टेंबलाय, निरगुडी, अंजदे, कलमाडी परिसरात दादर, मका, भाजीपाला व कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. पिके आडवी पडली आहेत. लोकप्रतिनिधींनी थेट शेतशिवारात जाऊन पाहणी केली. नुकसानीचा अंदाज घेतला व शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. 

आवश्य वाचा- अंगावर बर्फ पडल्‍याने जवानाचा मृत्‍यू; महिनाभरात चाळीसगाव तालुक्‍याने दुसरा जवान गमावला

आमदार जयकुमार रावल यांच्या निर्देशानुसार शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते कामराज निकम, जिल्हा परिषद सदस्य देवीदास बोरसे, भाजपचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकरी वासुदेव बेहरे, पंडित मोरे, रोहित वाडिले व नुकसानग्रस्त शेतकरी या वेळी उपस्थित होते. 

भाजीपाला भुईसपाट 
दोन दिवसांपासून शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसाने अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. आणखी दोन-तीन दिवस हे वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे पिकांची अवकळा झाली आहे. भाजीपालाही भुईसपाट झाला आहे. रब्बीसाठी शेती तयार करण्यास व पेरणीसाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. 

वाचा- राज्यपाल म्हणतात शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल 

शेतीकामे ठप्प 
शिंदखेडा तालुक्यातील तापी पट्ट्यात कोरडवाहू दादरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दादरीचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामे करावेत. शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapadne crisis on agricultural crops due to untimely rains