esakal | शेतकर्‍यांची हाक; कुणी रोप देता का रोप, रोपाला सोन्याचा भाव !    
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकर्‍यांची हाक; कुणी रोप देता का रोप, रोपाला सोन्याचा भाव !     

जळगाव, नाशिक आणि मध्य प्रदेशमधून रोपाची मागणी वाढली आहे. व्यापारी खेड्यापाड्यातील शेती शिवारात फिरुन रोप शोधताहेत. मागेल तो भाव देवू असे आमिष दाखवित आहेत.

शेतकर्‍यांची हाक; कुणी रोप देता का रोप, रोपाला सोन्याचा भाव !    

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे  : तीन महिने पाऊस झाला. जून व जुलैमध्ये रोप फोकता आले नाही. ज्यांनी फोकले, ते उबवलेच नाही. श्रावण व भाद्रपदमध्ये कांदा लागवडीसाठी रोप हवे, ते कसे मिळणार. मग आता शेतकर्‍यांचा रोपसाठी शोध सुरु झाला आहे. कांद्याच्या रोपाचे आगार असलेल्या शेतकर्‍यांवर 'कोणी रोप देता रोप' असे म्हणण्याची वेळ आली आहे. ज्यांच्याकडे विक्रीस आहे, ते एका किलोच्या कांदा बियाणे रोपसाठी दहा हजार मोजत आहेत, एवढा सोन्याचा भाव रोपाला मिळत आहे.

एका किलोस दहा हजार
धुळे तालुक्यात कापडणे, न्याहळोद, सोनगीर, नगाव, बोरीस, बुरझड, वडेल, लामकानी, कुसूंबा, नेर, आनंद खेडे आदी गावे कांद्याचे रोप व कांदा उत्पादनाचे आगार म्हणून प्रसिध्द आहेत. सध्या या गावांमध्येच कांदा रोपाची टंचाई जाणवत आहे. जळगाव, नाशिक आणि मध्य प्रदेशमधून रोपाची मागणी वाढली आहे. व्यापारी खेड्यापाड्यातील शेती शिवारात फिरुन रोप शोधताहेत. मागेल तो भाव देवू असे आमिष दाखवित आहेत. साधारण एक किलो रोप टाकलेले असल्यास त्यास किमान दहा हजार मिळत आहेत.

कांदा चाळीत सडतोय तरीही ?
उन्हाळ साठविलेला कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकला गेला. तरीही शेतकर्‍यांचा कांदा लागवडीकडे वाढताच कल आहे. तालुक्यातील बर्‍याचशा शेतकर्‍यांना तो छंद आहे. पाच वर्षांतून एकदा जरी भाव मिळाला तरी वसुल असे म्हणणार्‍यांची कमी नाही. म्हणूनच कांदा लागवड कमी झालेली नाही.


कांद्यापेक्षा रोप विक्री परवडते
चार महिन्यांनी कांदा पिकेल. भाव मिळेल. कर्ज फिटेल. हे साफ खोटं. रोप पिकवायचे. ते विकायचे. भाव मिळतोच. हेच परवडते. मागील वर्षी दीड लाख घडवीलेत. 
सुनील रमेश पाटील, कापडणे ता.धुळे 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image