शिल्लक असलेले धान्य गुरुजी विद्यार्थ्यांना वाटणार  

जगन्नाथ पाटील  
Thursday, 20 August 2020

मार्चमधील आठ प्रकारचा शिल्लक धान्यादी साठ्याचा आढावा घेतला. तो थेट विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे सांगितले. यातील बहुतांश साठा मुदतबाह्य झाला आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या आदेशाने गुरुजींसह पालकही अवाक झाले ​

कापडणे : २१ मार्चपासून लॉकडाउन सुरू झाला. सुटीतील कालावधीसह पाच महिन्यांपासून विद्यार्थ्यांसाठी शाळा लॉक आहेत. फेब्रुवारी आणि मार्चमधील आठ प्रकारचा शिल्लक धान्यादी साठा वितरण करण्याचे आदेश शिक्षण विभागाने राज्यातील प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांना आणि त्यांनी प्रत्येक शाळेला दिले आहेत. यातील बहुतांश साठा मुदतबाह्य झाला आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या आदेशाने गुरुजींसह पालकही अवाक झाले आहेत. नेमके काय करायचे, यासाठी गुरुजींची कसरत सुरू झाली आहे. 

व्हीसीद्वारे चर्चा आणि कागदी आदेश... 
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शालेय पोषाण आहारासंबंधी शिक्षण संचालकांनी राज्यातील शिक्षणाधिकारी व शापोआचे लेखाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. फेब्रुवारी आणि मार्चमधील आठ प्रकारचा शिल्लक धान्यादी साठ्याचा आढावा घेतला. तो थेट विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे सांगितले. यात मुदतबाह्य जिन्नस वितरित करू नका, असेही नमूद केले आहे. 

हा साठा शिल्लक 
फेब्रुवारीपासून सोयाबीन तेल, कांदा-लसूण मसाला, हळद, जिरे, मोहरी व मिरची पावडर पडून आहे. हे वितरणाचे आदेश झाले आहेत. 

आता राज्यातील गुरुजींची कसरत? 
शालेय पोषण आहारांतर्गत तांदूळ व डाळीव्यतिरिक्त इतर साठा केवळ सहा महिने मुदतीसाठीच पाठविलेला असतो. या जिनसा चांगल्या स्थितीत आहेत, हे कसे निरखायचे, असे प्रश्न गुरुजीच दबक्या आवाजात विचारू लागले आहेत. शालेय व्यवस्थापन समितीतही वितरणाबाबत मतभेद सुरू झाले आहेत. वितरणाच्या बाबतीत गुरुजींची कसरत सुरू झाली आहे. दरम्यान, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना या शिल्लक जिनसा वितरित होणार आहेत. खराब व मुदतबाह्य वितरणाचे आदेश आहेत. प्रत्यक्षात सहा महिन्यांची मुदतच संपल्याने वितरणाचे आदेश झालेतच कसे, यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapadne Government orders to distribute expired food grains to students, teachers confused