योग्य भाव मिळत नाही...म्हणून हजारो क्विंटल कांदा सडतोय चाळीत !

जगन्नाथ पाटील
Thursday, 16 July 2020

धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. खानदेशातील कांद्याचे आगार म्हणून धुळ्याची ओळख आहे.

कापडणे : ऐन उन्हाळ्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन झाले. शेतकर्‍यांनी एप्रिल मे मधील काढलेला उन्हाळी कांदा चाळीत भरला. बर्‍याच शेतकर्‍यांनी कुक्कुटपालनाच्या शेडमध्येही कांदा भरला. लाॅकडाऊन नंतर बर्‍यापैकी भाव मिळेल. या प्रतिक्षेत आजही चाळीत कांदा पडून आहे.

कांद्यातील सड वाढली आहे. शेतकर्‍यांचे नुकसान वाढतेच आहे. सध्या कांद्याला प्रती क्विंटल पाचशेपासून सातशेपर्यंतचा भाव मिळत आहे. उन्हाळी कांद्याला किमान दोन हजाराचा भाव मिळाल्यास परवडत असल्याचे उत्पादक शेतकर्‍यांनी सांगितले.

धुळे खानदेशातील कांदे आगार
धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. खानदेशातील कांद्याचे आगार म्हणून धुळ्याची ओळख आहे. तर कापडणे, लामकानी, नेर व कुसूंबा परीसराला जिल्ह्यातील कांद्याचे आगार म्हटले जात असते. जिल्ह्यातून तीन सीझनमध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते. 

बांग्लादेशमध्ये होतो निर्यात
जिल्ह्यातील कांद्याला इंदौर, नागपूर, सुरत, लासलगाव येथील बाजारात मोठी मागणी असते. विशेष म्हणजे धुळ्याच्या बाजारात स्थानिक कांद्याची आवक होताच भाव पाडले जातात. यासाठी नियमित आंदोलने होत असतात. भाव कमी मिळत असल्याने शेतकर्‍यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून बाहेरील बाजारांमध्ये स्थान निर्माण केले आहे. वडणे येथील सेंद्रीय कांद्याला विशेष मागणी असते. तर गेल्या पाच सहा वर्षांपासून बांग्लादेशातही निर्यात होवू लागला आहे. यासाठी व्यापारी थेट बांधावर पोहोचत असतात.

कांद्या सडतोय...
उन्हाळ्यात पुर्णतः लाॅकडाऊन होते. शेतकर्‍यांनी कांदा चाळीसह कुक्कुटपालनाच्या शेडमध्येही भरला. पावसाळ्यात बर्‍यापैकी भाव मिळेल. या आशेने शेतकर्‍यांनी कांदा टिकविण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. अद्यापही प्रती क्विंटल सातशेपेक्षा अधिक भाव नसल्याने पडून आहे. बराचसा कांदा उकिरड्यावर फेकला जात आहे. कांद्याला किमान दोन हजाराच्या भावाची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे.

उत्पादन खर्चावर द्या भाव
शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव नको. उत्पादन खर्चावर आधारीत भाव दिला पाहिजे. कांदा निर्यातीला परवानगी मिळाली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढताच असल्यामुळे शेतीमालाला पाहिजे तेवढी मागणी नाही. त्यामुळे कांदा चाळीत सडत आहे.
- आत्माराम पाटील, कांदा उत्पादक व माजी जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना धुळे 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapadne Thousands of quintals of onions are rotting due to lack of proper prices