esakal | सततच्या पावसाने चाळीतील साठवीलेला कांदा आता उकिरड्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

सततच्या पावसाने चाळीतील साठवीलेला कांदा आता उकिरड्यावर

कांद्यातील सड मोठ्या प्रमाणावर वाढली. उन्हाळ कांदा ७० टक्के उकिरड्यावर फेकला गेला. उर्वरित कांद्यालाही अधिक भाव मिळण्याची अपेक्षा मावळल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

सततच्या पावसाने चाळीतील साठवीलेला कांदा आता उकिरड्यावर

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे  : उन्हाळ कांद्याच्या भावाअभावी शेतकऱ्यांचे वांधे झाले आहेत. चाळीत कांदा साठविला. भाव वाढेल या आशेने तिष्ठत आहेत. सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात सड झाली आहे. साठविलेल्या कांद्यापैकी ७० टक्के कांदा खराब झाला आहे. आता हा सडलेला कांदा उकिरड्यावर फेकला जात आहे. उर्वरित कांदाही मातीमोलच होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 


धुळे व नंदुरबारमधील शेतकऱ्यांनी लॉकडाउनमध्ये कांदा चाळीत साठविला. बाजारपेठा बंद होत्या. निर्यातबंदी होती. स्थानिक ग्राहकही नसल्याने भाव नव्हता. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठविला. किमान प्रतिक्विंटल दोन हजारांचा भाव मिळेल, या आशेने चार महिने निघून गेले. तरीही योग्य भाव मिळाला नाही. 

निर्यात धोरण खुले, तरीही... 
केंद्र सरकारने कांद्यावर जाचक पद्धतीने निर्यात शुल्क लावले होते. गेल्या महिन्यापासून निर्यात शुल्क काढून घेतले आहे. कांद्याला खुला बाजार उपलब्ध झाला आहे. तरीही भावात अपेक्षित सुधारणा झालेली नाही. परिसरात दोन महिन्यांपासून सातत्यपूर्ण पाऊस होत आहे. कांद्यातील सड मोठ्या प्रमाणावर वाढली. उन्हाळ कांदा ७० टक्के उकिरड्यावर फेकला गेला. उर्वरित कांद्यालाही अधिक भाव मिळण्याची अपेक्षा मावळल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

उन्हाळ कांद्याला योग्य भाव मिळाला नाही, तो सडत आहे. आता पावसाळी कांद्याचे क्षेत्र अधिक वाढले आहे. आगामी काळातही कांद्याला अधिक भाव मिळेल, याची खात्रीच नाही. शासनाने उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यायला हवा. 
-संभाजी पाटील, कांदा उत्पादक शेतकरी  

संपादन- भूषण श्रीखंडे