विद्यापीठांतर्गत पंचवीस महाविद्यालयांमध्ये समुपदेशन कक्षाची स्थापना   

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मे 2020

महाविद्यालयांमध्ये हे कक्ष स्थापन केले असून संबंधित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाकडे समन्वय म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

जळगाव  : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक विषयक मार्गदर्शन व शंकांचे निरसन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत 25 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शंका निरसन व समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी गठित केलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष व हेल्पलाइन सुरू करावी असे नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या आदेशानुसार महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शंका निरसन व समुपदेशन कक्षाची स्थापना केली आहे. विद्यापीठांतर्गत 25 महाविद्यालयांमध्ये हे कक्ष स्थापन केले असून संबंधित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाकडे समन्वय म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 

संकेतस्थळावर महाविद्यालयाची यादी 
विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर महाविद्यालयाची यादी देण्यात आली आहे. या यादीत महाविद्यालयांतर्गत येणारे तालुके आणि विद्याशाखा तसेच समन्वयकाचे नाव, मोबाईल क्रमांक व ई- मेल नमूद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे संपर्क साधावयाचा आहे. दरम्यान विद्यापीठात स्थापन केलेल्या कक्षाचे कामकाज सोमवारपासून सुरू झालेले असून चार दिवसात 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दूरध्वनी व ईमेल द्वारे आपल्या शंका विचारल्या. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. ए. बी. चौधरी हे कक्षाचे समन्वयक म्हणून काम पाहत असून सदस्य म्हणून प्रा. किशोर पवार, प्रा. समीर नारखेडे, प्रा. अजय पाटील, प्रा. नवीन दंदी, प्रा. उज्वल पाटील हे काम पहात आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kbc nortt maharastra univercity under 25 colleges Establishment counseling rooms