उदंड झाल्या दिनदर्शिका

calender
calender

सोनगीर : दरवर्षी दिनदर्शिका छापून विक्रीचा व्यवसाय वाढत असून, यंदा मोठ्या प्रमाणात दिनदर्शिका बाजारात आल्या आहेत. पण विविध धार्मिक संस्थान, स्थानिक युवक, वृत्तपत्रे, पतसंस्था व अन्य काही गट, संघटनांनी दिनदर्शिका काढून सभासदांसह अन्य ग्रामस्थांनाही चक्क मोफत दिनदर्शिका वाटल्या जात आहेत. त्यामुळे काही घरात चार ते पाच दिन दिनदर्शिका येऊन पडल्या आहेत. कोणी घेता का दिनदर्शिका? अशी स्थिती झाली आहे. 

तालुक्यात सुमारे तीनशे दिनदर्शिका आहेत. अनेक हौशी युवक या व्यवसायात उतरले असून, आर्थिक, सामाजिक व राजकीय पत वाढविण्याचा प्रयत्न दिनदर्शिकेतून होत आहे. पूर्वी दिनदर्शिकेतून तारीख, वार, सणवार, तिथी, दिनविशेष केवळ यांची माहिती मिळे. मात्र, गेल्या काही वर्षापासून दिनदर्शिका हे प्रत्येकाच्या गरजानुसार माहिती देणारी जणू काही पुस्तिकाच बनली आहे.

विशेष लेख, रेल्वे, बस वेळापत्रक, मासिक भविष्य, राष्ट्रपुरूषांची जयंती, पुण्यतिथीची माहिती, यात्रा, पाककला, योगासने, सूर्यनमस्कार, आरोग्य टीप्स, दैनंदिन महत्वाच्या नोंदी लिहिण्याची सोय आदी विविधांगी माहितीची एक दालनच असलेली दिनदर्शिका गृहिणींना विशेष उपयुक्त ठरत आहे. संगणक, इंटरनेट व मोबाईलमुळे माहितीचा खजिनाच हाती आला असतांना दिनदर्शिकांची माहिती संदर्भात उपयुक्तता कमी झाली. पण जाहिरातीसाठी दिनदर्शिकेची उपयुक्तता लक्षात आल्यावर माहितीबाबतचे वलय कमी होऊन गावोगावचे लहान मोठे नेते, लहानमोठे व्यावसायिक दिनदर्शिकेच्या पानांवर झळकू लागले.

गावोगावी दिनदर्शिका छापून वितरित होवू लागल्या. आता इतक्या दिनदर्शिका तयार झाल्यावर विकत कोण घेणार? त्यामुळे मोफत वाटप सुरू झाले. सर्वच सहकारी संस्था, धार्मिक संस्था तर काही ठिकाणी समाजसेवी युवक, राजकीय नेते, नावाजलेल्या आर्थिक संस्था, दवाखाने, विमा एजंट, शालेय संस्था आदी दिनदर्शिका बनवू लागले. जगात चाळीस विविध प्रकारच्या दिनदर्शिका असून, सर्वात जास्त ग्रेगोरियन (इंग्रजी महिने) दिनदर्शिका वापरली जाते.

आपल्याकडे हिंदू (शालिवाहन शक ) इस्लामिक (उर्दू) दिनदर्शिका असल्या तरी इंग्रजी दिनदर्शिकेतच दोन्ही भाषिक महिन्यांची माहिती दिली जाते. व्यवसायाला चालना
स्टेशनरी दुकाने, किरकोळ विक्रेते, पुस्तकांची दुकाने, खासगी वितरक यांच्याकडे अनेक प्रकारच्या आणि प्रत्येकाच्या आवडीला व गरजेला अनुरूप दिनदर्शिका उपलब्ध आहेत. दिनदर्शिका तयार करणारे, त्यासाठी चित्रे-छायाचित्रे काढणारे, डिझाइन करणारे, संगणकावर ग्राफिक्स करणारे, छपाई करणारे, मजकूर पुरवणारे, वितरक आणि विक्रेते अशा अनेकांच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे.

वेगवेगळया ठिकाणी ठेवण्यासाठी वेगवेगळया स्वरूपातील दिनदर्शिका देखण्या ढंगात उपलब्ध झाल्या आहेत.
पूर्वी कालनिर्णय, निर्णयसागर, महालक्ष्मी, भाग्योदय, साईनिर्णय आदि पंचांगांना प्राधान्य असणा-या दिनदर्शिका खरेदी करणारा परंपरागत ग्राहकवर्ग होता. स्थानिक व मोफत मिळणाऱ्या दिनदर्शिकांमुळे पुर्वीच्या दिनदर्शिकांचा ग्राहक वर्ग कमी झाला आहे.

विविध आकार

दिनदर्शिकांचे विविध आकार मन वेधून घेतात. यातही स्पर्धा आहे. घरात लावण्यासाठी विशिष्ट आकाराच्या दिनदर्शिका, कार्यालयात त्यापेक्षा मोठ्या, कारखान्यात जंबो आकाराच्या, वाहनांमध्ये तुलनेने लहान, कारमध्ये पोस्टकार्ड साईजशिवाय खिशात मावतील अशा दिनदर्शिकाही आहेत. वर्षाच्या सुरवातीला काही दिवस खरेदी- विक्री होत असूनही अब्जावधीची उलाढाल होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com