सावधान...टोळधाड खानदेशच्या वेशीवर; शेतकऱ्यांनो, अशी घ्या काळजी! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

मध्यप्रदेशातून विदर्भात टोळधाड किडीचे आगमन झाले आहे. जळगाव जिल्ह्याला लागूनच मध्यप्रदेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. 
- नंदकिशोर नाईनवाड, उपविभागीय कृषी अधिकारी ः पाचोरा 

भडगाव : मध्यप्रदेशातून सातपुडामार्गे राज्यात टोळधाड किडीचे आगमन झाले आहे. विदर्भात संत्री उत्पादकांच्या मोर्शी तालुक्यात हे कीड आढळून आले असून जे हिरव्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 

राजस्थानमध्ये पाकिस्तान सीमेवरील वाळवंटात हे टोळधाड कीड जन्म घेते. हे कीड नाकतोडा वर्गीय असून दिवसभरात शेकडो किलोमीटरने मोठ्या समूहाने ते प्रवास करते. हे कीड हिरव्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. झाडावरील सर्व हिरवी पाने ते खाऊन घेते व फक्त काड्या शिल्लक ठेवतात. मध्यप्रदेशाच्या सीमा ओलांडून विदर्भात या कीटकांनी प्रवेश केला आहे. जळगाव जिल्ह्याला लागूनच मध्यप्रदेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही धोक्याची घंटा आहे. या कीटकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. 

अशी घ्यावी काळजी 
कृषी विद्यापीठांनी या किडीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत. त्यात आपल्या शेतात वेगवेगळ्या ठिकाणी कडुनिंब, धोतरा, इतर तणे किंवा पालापाचोळा याची पाने जाळून धूर तयार करायला हवा. शेकोट्या तयार करा, त्या धुरामुळे टोळधाड तुमच्या शेतात बसणार नाही. शेतात टिनाचे डबे, प्लॅस्टिकच्या बॉटल्स व इतर साहित्याच्या साहाय्याने मोठे आवाज काढा, ट्रॅक्टरचे सायलेन्सर काढल्यावर सुद्धा फार मोठा आवाज होतो. सायलेन्सर काढलेले ट्रॅक्टर शेतात फिरवल्यामुळे सुद्धा ही टोळधाड त्या आवाजामुळे शेतात शक्यतोवर बसणार नाही. याशिवाय शेतात क्लोरोपायरीफॉस ५० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ५ टक्के प्रमाण असलेली कीटकनाशके ३० ते ४० मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून त्याची पावर स्प्रे मार्फत किंवा ट्रॅक्टरवर ब्लोअर बसवून त्यामार्फत गावातील सर्व शेतकऱ्यांनी मिळून एकत्रित शेतात फवारणी करावी. त्यामुळे टोळधाडीला अटकाव घालता येऊ शकतो. 

तालुका कृषी विभागाकडून जनजागृती 
टोळधाड किडीचा वेगाने होणार प्रसार पाहता, कृषी विभागाने या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंबर कसली आहे. भडगाव तालुका कृषी विभागाने गावागावांत याबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. माहिती पत्रके, फलक, कृषी वार्ताच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या किडीबद्दल माहिती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी टोळधाड किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Locusts at the gates of Khandesh