लोकसभेची मतमोजणी 242 टेबलांवर होणार 

लोकसभेची मतमोजणी 242 टेबलांवर होणार 

जळगाव ः जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 23 मेस होणार आहे. प्रत्येक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी 16 टेबल लावण्यात येतील. लोकसभेच्या दोन्ही मतदार संघात एकूण 12 विधानसभा मतदार संघ आहेत. मतदान यंत्राची 192 टेबलांवर मतमोजणी होईल. सैनिकांच्या मतमोजणीसाठी रावेरसाठी 5 तर जळगावसाठी 15 टेबल असतील. टपाली मतमोजणीसाठी दोन्ही मतदार संघात दहा-दहा टेबल असतील. असे अशा एकूण 242 टेबलावर मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. 

येथील एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी सहाला मतमोजणी कर्मचारी, अधिकारी, उमेदवार, प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येईल. ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशानाच प्रवेश देण्यात येईल. मतमोजणी ठिकाणी सर्वांना मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आली आहे. उमेदवार, प्रतिनिधी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे सील केलेली स्ट्रॉंगरूम उघडण्यात येईल. नंतर विधानसभा निहाय मतदान यंत्रे बाहेर काढून संबंधित टेबलावर नेण्यात येतील. मतदान यंत्रे नेण्यासाठी शिपायांना ड्रेसकोड दिलेला आहे. 

सैनिकांच्या, मतदान कर्मचाऱ्यांच्या मतदानाची मोजणी अगोदर होईल. मतमोजणी जसजशा राऊंडमध्ये होईल त्यानुसार निकाल "सुविधा ऍप'चर अपलोड होईल. तो सर्वांनाच पाहता येईल. दुपारी दोनपर्यंत दोन्ही मतदार संघाचे निकाल जाहीर होतील असा अंदाज आहे. 

टपाली मतदानाचा टक्का कमी 
जळगाव लोकसभा मतदार संघात सैनिकांना (ईटीपीबीएस यंत्रणा) 6 हजार 48 मतपत्रिका पाठविल्या होत्या. त्यापैकी 3 हजार 978 मतपत्रिका मतदान होऊन परत आल्या. मतदान कर्मचाऱ्यांना 9 हजार 917 मतपत्रिका पाठविल्या होत्या. त्यापैकी 2 हजार 988 मतपत्रिका मतदान होऊन आल्या. रावेर लोकसभा मतदार संघात सैनिकांना (ईटीपीबीएस यंत्रणा) 1 हजार 944 मतपत्रिका पाठविल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 104 मतपत्रिका मतदान होऊन परत आल्या. मतदान कर्मचाऱ्यांना 9 हजार 202 मतपत्रिका पाठविल्या होत्या. त्यापैकी 2 हजार 402 मतपत्रिका मतदान होऊन आल्या. मतमोजणीच्या 3 दिवस अगोदरपर्यंत टपाली मतदान स्वीकारता येते. 

मतमोजणी ठिकाणी मोबाइलला बंदी 
मतमोजणीसाठी उमेदवारांना आपले प्रतिनिधी नेमता येतील. मात्र त्याठिकाणी मोबाईल नेता येणार नाही. ज्या टेबलवर प्रतिनिधीची नियुक्ती असेल त्याचठिकाणी त्यांनी थांबावे, इतरत्र फिरू नये. मतमोजणीची गोपनीयता भंग करू नये, अशा सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज येथे उमेदवारांच्या बैठकीत दिल्या. यावेळी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com