उगमस्थानीच नद्या गाडत, नाल्यावरील बांधकामामुळे महापुराचे गंडांतर 

residentional photo
residentional photo

नाशिक ः गोदावरीच्या त्र्यंबकेश्‍वर या उगमस्थानीच डोंगर फोडून आणि नद्या-नाले गाडून त्यांच्या पात्रातील अतिक्रमण वाढले आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी त्र्यंबकेश्‍वर गावात मुक्कामी थांबत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरला वारंवार येणारे पुराचे दुखणे निसर्गनिर्मित नसून जलस्रोत बुजवून विकत घेतलेले आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात त्र्यंबकेश्‍वरला चार वेळा घरे पाण्याखाली गेली. मुसळधार पाऊस त्यामागचे कारण सांगितले जाते. मात्र, मुळातच त्र्यंबकेश्‍वर इको संवेदनशील भाग (सेन्सेटिव्ह झोन)मधील ब्रह्मगिरीच्या कुशीतील पावसाचा भाग आहे. तेथे पूर्वापार पाऊस पडतोच, पण पूर्वी ब्रह्मगिरी-गंगाद्वार पर्वतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जात असे. आता पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या गोदावरी, अहिल्या, नीलगंगा यांसह म्हातार ओहोळ व इतर अनेक प्रमुख नालेच कॉंक्रिट टाकून गाडल्याने पावसाचे पाणी वाहून जायचे नाले राहिलेच कुठे? हीच मूळ समस्या त्र्यंबकेश्‍वरला वारंवार पूर निर्माण होण्याची आहे. 

अगोदर कॉंक्रिट, नंतर भराव... 
गोदावरी-अहिल्या संगमावर त्र्यंबकेश्‍वरला आतापर्यंत दोनदा कॉंक्रिटीकरण झाले. पहिल्यांदा कॉंक्रिटीकरण करताना नदीपात्रातील पाणी वाहून जाण्यासाठी सोय केली नाही. दुसऱ्यांदा कॉंक्रिटीकरण करताना पहिल्या कॉंक्रिटीकरणाचा मलबा न काढताच दुसरे कॉंक्रिटीकरण झाले. सोबतच नदीपात्रांना रस्त्याचे रूप देत त्यावर बाजार बसविला गेला. बाजार आणि रस्त्याचे रूप आल्यानंतर ठराविक वर्षांनंतर त्या रस्त्यावर कॉंक्रिटीकरणाचे थर टाकून टाकून नदीचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. परिणामी, डोंगरमाथ्यावरून येणारे पावसाचे पाणी उताराच्या दिशेने धावते. ते सरळ पूर्वापार प्रवाही नाल्यातून लोकांच्या घरात जाऊन माळीणसदृश स्थिती निर्माण झाली आहे. 

गोदावरी-अहिल्या गाडल्या, चौथ्यांदा महापूर 
त्र्यंबकेश्‍वरला या पावसाळ्यात 27, 28 जुलैला दोनदा महापुराची स्थिती उद्‌भवली. त्यानंतर पुन्हा 4 ऑगस्टला दोन दिवस तसेच चित्र राहिले. सगळे गावच्या गाव पाण्यात हे अलीकडे वारंवार व्हायला लागले आहे. साधारण 1953-54 मध्ये पहिल्यांदा गोदावरी-अहिल्या नद्यांच्या प्रवाहात संगमापासून ठराविक प्रवाह वाहता ठेवण्यासाठी सिमेंटचे पिलर टाकून कॉंक्रिटीकरण झाले. त्यानंतर दुसऱ्यांदा 2003 मध्ये पूर्ण कॉंक्रिटीकरण करून नद्या गाडल्या गेल्या. वास्तविक 2003 मध्ये कॉंक्रिटीकरण करताना जुन्या 53-54 मधील कॉंक्रिटीकरणाचे सिमेंटचे खांब (पिलर) काढून नदीपात्र मोकळे करण्याची गरज होती. तेव्हाच नदीपात्र मोकळे करून त्यावर कॉंक्रिटीकरण झाले असते. 

प्रवाह-ओहोळात घरे 
त्र्यंबकेश्‍वरच्या ब्रह्मगिरीवरून गोदावरी, अहिल्या, म्हातार ओहोळ यांसह नीलपर्वतावरून नीलगंगेसह अनेक नद्यांचे उगम आहेत. मात्र वाढत्या नागरीकरणात नद्यांच्या उगमस्थानाला नदी न म्हणता नाले म्हटले जाते. त्यावर भराव टाकून ते बुजविल्यानंतर त्यात राहिलेल्या भूमिगत गटारी केरकचरा, प्लॅस्टिक अडकून पाणी जायची सोयच राहिली नाही. बांधकामांचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे गंगाद्वारापासून निघणारे पाणी वाहायला जागाच नसल्याने थेट गावात पाणी साचलू लागले आहे. 

-वारंवार गावात पूर का येतो? 
-गोदावरी नदीवर कॉंक्रिटीकरणाने प्रवाह बंद 
-अहिल्या संगमावर कॉंक्रिटीकरणाने प्रवाह बंद 
-नीलपर्वतामागील नीलगंगेचा नाला बुजविला 
-म्हातार ओहोळ नावाचा मोठा नाला गायब केला 
-लहान-लहान भराव टाकून त्यावर बेसुमार बांधकामे 
-पहिल्या कॉंक्रिटीकरणावर ठराविक वर्षांनी पुन्हा कॉंक्रिट 
-वारंवारच्या कॉंक्रिटीकरणाने रस्ते झाले उंच, घरे मात्र खोल 


त्र्यंबकेश्‍वरच्या पुराचा प्रश्‍न सोडविण्याचे दोन उपाय आहेत. अल्पकालीन उपायात कॉंक्रिटीकरण करून पाण्याचा अडणारा प्रवाह मोकळा करणे. त्यात, कचरा, प्लॅस्टिकमुळे तुंबणारा प्रवाह मोकळा करणे, तर दीर्घकालीन उपायात जुने सगळे कॉंक्रिटीकरण काढून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जास्तीत जास्त जागा मोकळी करून देणे हा आहे. वरचा रस्ता कायम ठेवून खालून पावसाचे पाणी वाहून जाण्याची सोय करण्यासारखे पर्याय शोधावे लागतील. 
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com