महिनाभरापासून गायब तरूण आढळला कुजलेले शरीरात दोरीला लटकलेला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता. पाणी भरतांना ठिबकचा पाईप तुटल्याने तो पाहणी करतांना गेला असता लिंबाच्या झाडाला नॉयलानच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत भावाचा मृतदेह आढळून आला.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव, जळगाव) : उंबरखेडे (ता.चाळीसगाव) जळगाव येथे २५ वर्षीय युवकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आज सकाळी साडेनऊच्या सुमारास आढळून आला. हा तरुण गेल्या महिनाभरापासून बेपत्ता होता. त्याचा स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसताच एकच खळबळ उडाली. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
 
उंबरखेड येथील सागर वना पाटील (25) या तरुणांने त्याच्या स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला नॉयलानच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.मात्र हा मृतदेह कुजलेला होता. मयत सागर याचा भाऊ सचिन उर्फ उमेश वना पाटील हा आज सकाळी शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता. पाणी भरतांना ठिबकचा पाईप तुटल्याने तो पाहणी करतांना गेला असता लिंबाच्या झाडाला नॉयलानच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत भावाचा मृतदेह आढळून आला. ही घटना त्याने घरी सांगितली. त्यानंतर मेहूणबारे पोलीसांना माहिती देण्यात आली. मृतदेह मोठ्या प्रमाणावर कुजलेला असल्याने चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाविस्कर यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. 

मयत सागर पाटील हा १२ मार्चपासून बेपत्ता होता. याबाबत मेहूणबारे पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंदही करण्यात आली होती.त्याचा शोध लागलेला नसतांनाच आज सकाळी साडेनऊला त्याचा मृतदेह कुजलेल्या व गळफास घेतलेल्या अवस्थेत स्वत:च्या शेतात मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या तरूणाने आत्महत्या केली की, हत्या याबाबत शंका व्यक्‍त केली जात आहे. याप्रकरणी सचिन पाटील याने दिलेल्या खबरीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हवलदार अन्वर तडवी हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare one month missing young boy deadbody farm