मेहुणबारेतील शवविच्छेदनगृह ठरले ‘शो पीस’ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात आता शवविच्छेदनाची सोय उपलब्ध असली तरी या ठिकाणी सद्यःस्थितीत शवविच्छेदन करण्यासाठी माणूसच उपलब्ध नसल्याने ते बंद आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर शवविच्छेदनगृह वापरात येईल. 
- डॉ. बी. पी. बाविस्कर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, मेहुणबारे (ता. चाळीसगाव) 

मेहुणबारे (जळगाव,) : परिसरातील सुमारे ५९ खेड्यांचा संपर्क येणाऱ्या येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृह तब्बल बारा वर्षापासून बंद पडले आहे. या शवविच्छेदन गृहाची नुकतीच दुरुस्ती करण्यात येऊनही अद्याप ते वापरण्यात आलेले नाही. त्यामुळे शवविच्छेदनगृहाच्या दुरुस्तीसाठी झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत ‘शो पीस’ ठरलेले हे शवविच्छेदनगृह वापरात आणून ग्रामीण भागातील जनतेची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे. 
येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना आवश्यक असलेल्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत. केवळ शवविच्छेदनाची या ठिकाणी सोय नाही. वास्तविक, रुग्णालयाच्या आवारात शवविच्छेदन कक्ष म्हणून स्वतंत्र खोली कधीचीच बांधण्यात आली आहे. मात्र, एक तपापासून ती बंद आहे. काही दिवसांपूर्वी या खोलीची नव्याने दुरुस्ती करण्यात आली. मात्र, अद्यापही या खोलीचा प्रत्यक्षात वापर सुरू झालेला नाही. त्यामुळे शवविच्छेदन खोलीची दुरुस्ती करण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

मृतदेहाची हेळसांड 
ग्रामीण रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सन २००० मध्ये झाले होते. या ठिकाणी शवविच्छेदन करण्याची सुविधा नसल्याने चाळीसगावला मृतदेह घेऊन जावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी शवविच्छेदनगृहाची देखील सोय करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार, या खोलीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर ही खोली वापरात आणावी, अशी मागणी होत असतानाही अद्यापपर्यंत एकही शवविच्छेदन या ठिकाणी झालेले नाही. परिणामी, ही खोली बंद अवस्थेत आहे. रात्री अपरात्री मृतदेह आणल्यानंतर बऱ्याचदा मृतदेहाची अक्षरशः हेळसांड देखील होते. काही वेळा चाळीसगावला मृतदेह नेण्यासाठी वाहनच मिळत नाही. त्यामुळे मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात असलेल्या या शवविच्छेदन खोलीचा वापर सुरू करून या ठिकाणी शवविच्छेदनाची सोय व्हावी, अशी मागणी होत आहे. 

ठरावाला केराची टोपली 
येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची सोय होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विषय घेऊन त्याचा ठराव करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत आरोग्य विभागाकडे कधीचीच पाठवली आहे. मात्र, त्यावर आजपर्यंत कुठलीच कार्यवाही झालेली नाही. आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीच्या ठरावाला केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. या ठिकाणी जेव्हा जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत, तेव्हा तेव्हा येथील शवविच्छेदनाची अडचण त्यांच्या लक्षात आणून दिली आहे. मात्र, त्यांच्याकडूनही अद्यापपर्यंत दखल घेतली जात नसल्याचा अनुभव ग्रामस्थांना आलेला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनीच याबाबतीत गांभीर्याने दखल घेऊन ग्रामस्थांची ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare pm room closed last 12 year