सायगावमध्ये कोरोनाबाधित आढळल्यामुळे एवढ्या जणांना केलंय क्वारंटाइन; तर बाधिताच्या कुटुंबीयांना...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

गावातच त्यांच्या घरांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. रुग्ण राहत असलेल्या घराच्या परिसरात येण्याजाण्याला मनाई करण्यात आली आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : नांदगाव- सायगाव रस्त्यावरील आमोदे चेक पॉइंटवर ‘गावातील वाहने का अडवता’ असे सांगून पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सायगाव (ता. चाळीसगाव) येथील २२ जणांच्या विरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला कारोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने नांदगावसह चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे गिरणा परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील आठ व बाहेरच्या दहा अशा १८ जणांना चाळीसगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर सायगावमधील ४० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. रुग्ण राहत असलेला परिसर ‘सील’ करून गावात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करण्याबाबत कुठलेही पत्र नसतानाही चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावरील आमोदे चेकपाइंटवर पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केल्याची घटना १० मे स सायंकाळी सातच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी सायगाव (ता. चाळीसगाव) येथील २२ जणांविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यात पोलीस पाटलाचाही समावेश होता. या गुन्ह्यातील तीन फरार संशयितांना नांदगाव पोलिसांनी सायगाव येथून अटक केली. अटकेनंतर त्याची कोरोना चाचणी घेतली असता, त्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रात्री उशिराने प्राप्त झाला. ज्याला कोरोनाची लागण झाली आहे, तो संशयित अटकेपासून वाचण्यासाठी लपून छपून राहत होता. तो गेल्या दहा दिवसात सायगावसह धुळे, बोरकुंड (जि. धुळे), पाडळदे व मालेगाव आदी भागातही राहिल्याची चर्चा आहे. रात्री उशिरा त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सायगाव परिसरात भीती पसरली.

‘ई- सकाळ’च्या वृत्तामुळे प्रशासन हादरले
चाळीसगाव तालुक्यातील गावखेड्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याचे वृत्त रात्री बाराच्या सुमारास एकमेव ‘ई- सकाळ’वर झळकले. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली. हे वृत्त केवळ ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार, आज सकाळी तहसीलदार अमोल मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. पी. बाविस्कर, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्यासह आशा स्वयंसेविकांनी सायगावला जाऊन उपाययोजना केल्या. या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या त्याच्या कुटुंबातील १८ जणांना चाळीसगावला तर सायगावातील ४० जणांना गावातच त्यांच्या घरांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. रुग्ण राहत असलेल्या घराच्या परिसरात येण्याजाण्याला मनाई करण्यात आली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare Saigaon people were quarantined due to coronary heart disease