तापीतीरावर रंगणार गुरु-शिष्याचा उत्सव

संदीप शिंपी
Tuesday, 18 February 2020

तापीतीरावरील श्रीक्षेत्र मेहूण हे पूर्वी महत्‌नगर या नावाने ओळखले जायचे. या ठिकाणी ब्रम्हचित्कला सर्वसिध्द महायोगीनी आदिशक्ति मुक्ताई तापीतीरी गुप्त झाल्या आहेत.

चांगदेव (ता. मुक्ताईनगर) : खानदेश व विदर्भाचे श्रध्दास्थान असलेल्या आदिशक्ती मुक्ताईच्या यात्रोत्सवास तापीतीरावरील श्रीक्षेत्र मेहूण येथे बुधवार (ता. १९) पासून सुरुवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे माघ वद्य एकादशी पासून ते महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजेच अमावस्येपर्यंत हा यात्रोत्सव सुरु असतो. हा यात्रोत्सव आदिशक्ती मुक्ताई व संत सिध्देश्वर चांगदेव महाराजांचा गुरु शिष्याचा अतुट स्नेहबंधनाचा एकप्रकारे उत्सवच होय. 

श्रीक्षेत्र मेहूण येथे पाच दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासाठी असंख्य दिंड्यांसह वारकरी दाखल झाले आहेत. उद्या (ता. १९) पहाटे काकडा आरतीने सुरुवात होऊन, संत मुक्ताईच्या मुर्तीला मंगल स्नान घालून, सकाळी पाचला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील व त्यांचे पती प्रल्हाद पाटील आणि माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते सपत्नीक महाअभिषेक व महापूजा संस्थानचे अध्यक्ष रामराव महाराज यांच्या उपस्थितीत होऊन, मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येईल. पालकमंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे सकाळी आठला भेट देणार आहेत. तसेच महाशिवरात्रीच्या पर्वावर (ता. २१) श्रीक्षेत्र मेहूण येथे मुक्ताई व पुरातन सोमेश्वर महादेव मंदिर येथे महापूजा व अभिषेक खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते होणार आहे.

आर्वजून पहा :सरकारी कर्मचाऱ्यांना उरले 205 दिवस काम 
 

आध्यात्मिक महत्व
तापीतीरावरील श्रीक्षेत्र मेहूण हे पूर्वी महत्‌नगर या नावाने ओळखले जायचे. या ठिकाणी ब्रम्हचित्कला सर्वसिध्द महायोगीनी आदिशक्ति मुक्ताई तापीतीरी गुप्त झाल्या आहेत. त्यामुळे येथे संत मुक्ताईचे भव्य देवस्थान आहे. या ठिकाणी बाराही महिने धार्मिक कार्यक्रम होत असतात. वारीच्या एकादशीला मुक्ताई दर्शनाला वारकरी सांप्रदायामध्ये पवित्र व महत्त्वाचे मानले जाते. माघ महिन्यातील वद्य एकादशीला सुरु होणारा भव्य यात्रोत्सव असल्याने  राज्यभरातू दिंड्यांद्वारे वारकरी दर्शनासाठी येतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktaeenagar muktarr yatra utsaw start tomorrow