आता पाच रुपयांची नोट चलनातून बंद; कोणी घेतलाय निर्णय

योगीराज ईशी
Tuesday, 22 September 2020

भारतीय चलनात असलेल्‍या नोटा किंवा डॉलर कधी चलनातून बंद हेाईल सांगणे अवघडच आहे. एक हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय अधिकृतपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. पण आता पाच रूपयाची नोट देखील चलनातून बाद होत आहे. याचा निर्णय कोणी आणि कधी घेतलाय हे जाणून घेवूया.

कळंबू (नंदूरबार) : चलनातून नोट किंवा डॉलर बंद करण्यापुर्वी रिझर्व्ह बँकेची अधिसूचना असते. परंतु, अशा कोणत्‍याही प्रकारची आदी सूचना जाहीर नसतांना पाच रूपयांची नोट चलनातून बाद केल्याचे दिसून येत आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने चलनात एक रूपयाच्या डॉलरपासून दोन हजार रूपयांची नोट आहे. चलनात नवीन नोट आणणे किंवा ती चलनातून बाद करण्याचा निर्णय देखील बँकेच्या परवानगी शिवाय होत नाही. परंतु पाच रुपयांची नोट चलनातून बाद केल्याची अधीसूचना नसतांना देखील याचा परस्‍पर निर्णय सर्वच व्यवसायिक व ग्राहकांनी घेतल्याचे जाणवून येत आहे. चुकून जरी एखादा ग्राहक पाचची नोट घेऊन काही खरेदीसाठी दुकानात किंवा संबंधित ठिकाणी गेला; तर व्यवसायिक अथवा दुकानदाराकडून पाच रुपयांची नोट चलनातून बाद झाल्याचे सांगून नोट घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. बहुतेकवेळेस व्यवसायिक व ग्राहकांमध्ये पाचची नोट देवाण- घेवाणीवरून वाद निर्माण होताना दिसून येतात.

दहाच्या डॉलरबाबतही होती अफवा
पाच रूपयांच्या नोटबाबत सध्या जसे वादंग सुरू आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी दहा रुपयांच्या डॉलर बंद झाल्याची अफवेने वादंग उठले हेाते. दहा रूपयाचा डॉलर घेण्यास बहुतेक जण नकार देत होते. दहाचा डॉलर पितळी सारखा बनवल्याने काहींनी बॅलेन्स म्हणून दहाचे डॉलर साठणून ठेवले होते. परंतु, जेव्हा दहा रुपयांचा कॉईन चलनातून बाद झाल्याची अफवा पसरताच बहुतेकांनी घरचे गल्ले खाली करून बँकामध्ये भरणा करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. दहा रुपयांचा डॉलर बंद झाल्याच्या अफवेप्रमाणे पाच रुपयांची नोट चलनातून बंद झाल्याची हि अफवाच असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. 

अन्‌ पाकिटात साठवण
पाच रूपयांची नोट चलनात असताना जुन्या अगदी फाटक्‍या नोटा घेतल्‍या जात नाही. परंतु, नवीन छपाई होवून आलेल्‍या पाच रुपयांची नोट देखील घेतली जात नाही. ही नोट बंद झाल्याच्या अफवेने बहुतेकांनी प्रेस कट नोट पाकीट मनी म्हणून पाकिटात ठेवणे पसंद केल्याचे आढळून आले.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nadurbar five rupee note closed from circulation in rumors