नंदूरबार जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर सुरूच 

धनराज माळी
Thursday, 19 November 2020

बारमाही काम नसल्याने ५० हजारांपेक्षा जास्त मजूर परराज्य व परजिल्ह्यात स्थलांतर करतात. नंदुरबार जिल्ह्यातील मजुरांसाठी लगतचे गुजरात राज्य जगण्याचा आधार बनले आहे.

नंदुरबार ः कोरोना महामारीचे संकट संपलेले नाही. तरीही मरणाचे भय न बाळगता जिल्ह्यातील शेकडो मजुरांचे जत्थे गुजरात व इतर जिल्ह्यांत स्थलांतर करू लागले आहेत. स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या वाहनांना अपघात घडून आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला, तर काहींना जायबंदी व्हावे लागले. पोटाची खळगी भरण्यासाठी करावे लागणारे स्थलांतर मात्र गरीब मजुरांचा जिवावर उठले आहे. 

 

वाचा- शाळा उघडण्याच्या तीन दिवस अगोदरच शिक्षकांची जत्रा

स्थलांतर जिल्ह्यातील मजुरांसाठी शाप की वरदान, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक स्तरावर शेती व बांधकामाव्यतिरिक्त कोणतेही उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न कायम आहे. बारमाही काम नसल्याने ५० हजारांपेक्षा जास्त मजूर परराज्य व परजिल्ह्यात स्थलांतर करतात. नंदुरबार जिल्ह्यातील मजुरांसाठी लगतचे गुजरात राज्य जगण्याचा आधार बनले आहे. आतापर्यंत गुजरातच्या भूमीने रोजगारानिमित्त जाणाऱ्या हजारो कुटुंबांना आपल्या कुशीत सामावून घेतले आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. 

गुजरातमध्ये अनेक रोजगार 
गुजरातमधील सुरत, उधना, चलथान, बारडोली, नवसारी, अंकलेश्वर, वापी, दमण येथे नंदुरबार जिल्ह्यातील मजूर स्थलांतर होतात. त्याठिकाणी शेतीचे कामांमध्ये ऊसतोडणी, शेतीची रखवाली, भात व ऊस लावणे, रस्त्याचे काम, बांधकाम, विविध कंपन्यांमध्ये कामगार म्हणून, तर शिक्षित तरुणांना मुकादम म्हणून कंपन्यांमध्ये कामे मिळतात. त्यामुळे नंदुरबार ही जन्मभूमी असली, तरी गुजरात कर्मभूमी बनली आहे. बारमाही रोजगार मिळत असल्याने अनेक कुटुंबे पावसाळ्यात गावाकडे येतात. दिवाळी किंवा तुलसी विवाहापर्यंत येथे राहतात. त्यानंतर पुन्हा स्थलांतर करतात. 

रोजगाराकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 
नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्यात उद्योगव्यवसायांना चालना मिळेल व स्थलांतराला आळा बसेल, अशी अपेक्षा मजुरांसह बेरोजगारांना होती. मात्र, २१ वर्षे उलटूनही साधा येथील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी सर्वांत प्रथम रोजगारनिर्मिती करणे गरजेचे आहे. 

आवश्य वाचा- एकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह, उपचारासाठी मुंबईला जाणार

 

कोरोना महामारीचे भय विसरले 
कोरोना महामारीत स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी आणण्यासाठी शासनाने प्रयत्न केले. स्थानिक रोजगार हमीची कामेही दिले. त्याचा मोबदलाही दिला. मात्र, शासनाने कोरोनाच्‍या नियमांमध्ये शिथिलता देताच रोजगारासाठी मजुरांनी परराज्याची वाट धरली. पोटाची खळगी भरण्यापुढे या मजुरांना कोरोनाचे भयही राहिलेले नाही. स्थलांतर करणे अनेकांच्या जिवावर उठू लागले आहे. अनेकांना वाहनांचा अपघात घडून जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nanadurbar migration of laborers in the district continues