esakal | शेतकरी, तरुणांना नोकरीचे आमिष दाखविणाऱया टोळ्यांचा नायनाट करणार !
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी, तरुणांना नोकरीचे आमिष दाखविणाऱया टोळ्यांचा नायनाट करणार !

शेतकऱ्यांची फसवणूक होते. उधारीवर शेतकरी विश्वासाने आपला माल देतो, व्यापारी त्यापोटी धनादेश देतात, मात्र नंतर ते धनादेश वटत नाहीत. हा प्रकार गंभीर आहे

शेतकरी, तरुणांना नोकरीचे आमिष दाखविणाऱया टोळ्यांचा नायनाट करणार !

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार  ः नाशिक परिक्षेत्रात शेतकऱ्यांची कृषिमाल व्यापाऱ्यांकडून पैसे न देणे, बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे. त्यांचा नायनाट करणे व शेतकरी-बेरोजगारांना न्याय देणे, याला सर्वप्रथम माझे प्राधान्य राहणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत ४१ गुन्हे दाखल झाले असून ३९ जणांनी पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली. 

डॉ. दिघावकर गुरूवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हा पोलिस दलाचा आढावा घेतला. पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी आदी उपस्थित होते. 

डॉ. दिघावकर म्हणाले, नाशिक परिक्षेत्रात द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा माल उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी परिसरातील व्यापारी खरेदी करतात. त्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची फसवणूक होते. उधारीवर शेतकरी विश्वासाने आपला माल देतो, व्यापारी त्यापोटी धनादेश देतात, मात्र नंतर ते धनादेश वटत नाहीत. हा प्रकार गंभीर आहे. बेरोजगार तरुणांना गंडविणाऱ्या सक्रिय टोळ्या नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यात आहेत. या दोन मुद्यांवर माझे विशेष लक्ष केंद्रित आहे. त्यात आत्तापर्यंत ४१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांपैकी ३७ व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे परत देण्याचे लिहून दिले आहे. याही पुढे ती मोहीम सुरू राहील. 
 

गुटखा व्यापारी, उत्पादकांवरही गुन्हे 
गुटखा तस्करी वाढली आहे, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात गुटखा जप्तीची कारवाई झाली आहे. आत्तापर्यंत गुटखा तस्करीचे प्रमाण लक्षात घेता गुटखा वाहून नेणाऱ्या वाहनचालक व क्लीनरवर गुन्हे दाखल केले जात होते. आता ज्यांच्याकडून तो माल घेतला आहे त्यांच्यासह ज्यांनी खरेदी केला, त्यावरही गुन्हे दाखल करणार आहे. गुटख्याचे मुळासकट उच्चाटन करण्याचा पोलिस प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. 

दोन नवीन पोलिस ठाणे 
नंदुरबार जिल्ह्यात दोन नवीन पोलिस ठाणे प्रस्तावित आहेत. शहादा व नवापूर येथे पोलिस ठाणे व एक पोलिस दूर क्षेत्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती लक्षात घेता ते प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यावरही लवकरच अंमलबजावणी होईल. 

तालुका पोलिस ठाण्याचे लवकरच उद्घाटन 
होळ शिवारात भालेर रस्त्यावर तालुका पोलिस ठाणे निर्माण होऊ सज्ज आहे. मात्र तेथे फर्निचरचे काम प्रलंबित आहे. डिपीडिसीकडे त्यासाठी २२ लाखाचा प्रस्ताव दिला आहे. तो मंजूरही झाला आहे. मात्र कोरोना परिस्थितीमुळे त्यासाठीचा मंजूर निधी दुसरीकडे खर्च करण्यात आल्याने तालुका पोलिस ठाण्याचे फर्निचरचे काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे त्याचे उद्घाटनही झालेले नाही. लवकरच तो प्रश्न निकाली निघेल अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. 

 
कुणावरही अन्याय, अत्याचार होणार नाही. नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधला तरी त्यासाठी पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही. मी थेट भेटतो. जनतेचे प्रश्न सोडविण्यास आणि चांगले प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न राहील. 
- डॉ. प्रताप दिघावकर, विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक. 

संपादन- भूषण श्रीखंडे नंदूरबार