आश्रमशाळेतून विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, उद्योजकतेचे शिक्षण 

धनराज माळी
Monday, 25 January 2021

पालकांनी आश्रमशाळेतील सुविधांचा विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, यासाठी मुलांना अधिकाधिक शिक्षण घेऊ द्यावे

नंदुरबार : आश्रमशाळेच्या माध्यमातून सक्षम आणि स्वयंपूर्ण विद्यार्थी घडावा यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकावर आधारीत शिक्षणही विद्यार्थ्यांना मिळावे असा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले. 

आवर्जून वाचा- नंदुरबार जिल्ह्यातील 339 शाळांची घंटा वाजणार

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत राणीपूर (ता. तळोदा) येथील माध्यमिक आश्रमशाळा नूतन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, माजी मंत्री पद्‌माकर वळवी, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, साहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा, तहसीलदार गिरीष वखारे आदी उपस्थित होते. ॲड. पाडवी म्हणाले, आदिवासी विभागातर्फे आश्रमशाळेसाठी ५५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना चांगला गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळावे, यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात येत आहे. पालकांनी आश्रमशाळेतील सुविधांचा विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, यासाठी मुलांना अधिकाधिक शिक्षण घेऊ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अडीच ते सहा वयोगटातील मुलांसाठी आश्रमशाळेत नर्सरीची सुविधा आणि पहिली ते पाचवीतील शिक्षण इंग्रजीतून देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. राणीपूर येथे मुलांच्या वसतिगृहालाही मंजुरी देण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. नकट्यादेव ते गोऱ्यामाळ या १३ कोटी खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

काळानुसार तंत्र आत्मसात करावे

ॲड. वळवी म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन बदलत्या काळानुसार नवे तंत्र आत्मसात करावे. नव्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. यातून गुणवत्ता वाढीला चालना मिळेल. शिक्षकांनी नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करावे. 

सुविधांचा लाभ घ्यावा
आमदार पाडवी म्हणाले, आश्रमशाळेमुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल. संगणकीय सुविधेचा लाभ घेऊन चांगले अधिकारी घडतील. पालकांनी आपली मुले शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 
डॉ. भारूड म्हणाले ९ कोटी खर्च करून ही सुसज्ज इमारत तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी चिकाटीने प्रगतीचा ध्यास करावा व मिळालेल्या संधीचे सोने करावे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nanadurbar skills development industrial development education students ashram school