
त्यांचे चालले होते गुपचूप..पोलिस धडकले आणि वधू- वरासह सर्वांचीच धावपळ
नंदुरबार : नंदुरबार शहर व तालुक्यात चोरी चोरी, छुपके छुपके लग्नाचा बार उडविणाऱ्या दोन लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. आयोजकांवर नियमांचे उल्लंघन करून विना परवानगी लग्न सोहळ्याचे आयोजन केल्या प्रकरणी दोन्ही घटनेतील १४ जणांवर नंदुरबार शहर व नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणु साथीच्या आजाराचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात कोरोना विषाणूचे वाढते संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी व लॉकडाऊन आदेश लागू केले आहेत. त्या आदेशात त्यांनी तोंडाला मास्क लावणे, रुमालचा वापर करणे, अनावश्यक गर्दी न करणे, लग्न समारंभासाठी स्थानिक पोलीस स्टेशनची पुर्व परवानगी घेणे अनिवार्य केले आहे. असे असतांना रविवारी (ता.२) शहरातील गवळीवाडा परिसरात व तालुक्यातील निंभेल येथे दोन ठिकाणी विना परवानगी विवाह सोहळा आयोजित करून नियमांचे उल्लंघन करीत २५ पेक्षा जास्त जणांची गर्दी केल्याचे आढळून आले.
वर- वधूसह आई- वडीलांवर गुन्हा
नंदुरबारचे नायब तहसिलदार भिमराव बोरसे तसेच शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, गोपनीय शाखेचे अंमलदार नरेंद्र देवराज, शैलेंद्र माळी, श्रीकांत पाटील यांनी दुपारी पवणे दोनच्या सुमारास लग्नस्थळी अचानक भेट दिली असता, लग्न समारंभाचे आयोजक विशाल सुधाकर गवळी (नवरीचे चुलत भाऊ), वधू लक्ष्मी गिरजाआप्पा गवळी, वधूपिता गिरजाआप्पा चिमाजी गवळी, आई रत्नाबाई गिरजाआप्पा गवळी (सर्व रा.गवळीवाडा नंदुरबार), तसेच वराचे वडील अरुण आबाजी गवळी (औशिकर), आई संगिता अरुण गवळी, वर ज्ञानेश्वर अरुण गवळी (सर्व रा. न्यायडोंगरी, ता.चाळीसगाव) यांनी लग्न समारंभासाठी पोलीस प्रशासनाकडून कुठलीही पुर्व परवानगी न घेता लग्न समारंभाचे आयोजन केले. त्यात ५० ते ६० लोकांची गर्दी जमवून तोंडाला मास्क अथवा रुमाल न वापरता लग्न समारंभात एकत्र जमले होते.त्यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लघंन करुन कोरोना विषाणुची साथ परसरण्यास वाव मिळेल, अशी बाधक कृती केली आहे. त्यामुळे नायब तहसिलदार भिमराव बोरसे यांनी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
दुसऱ्या ठिकाणीही तशीच परिस्थिती
दरम्यान तशीच घटना निंभेल (ता.नंदुरबार) येथे घडली. तेथेही पोलिसांची कोणतीही परवनगी न घेता नियमांचे उल्लंघन करीत विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याचे मंडळ अधिकारी प्रशांत निळकंठ देवरे यांना आढळून आले. त्यांनी नंदुरबार पोलिस ठाण्यात तशी फिर्याद दिली. त्यानुसार आयोजक अशोक बारकू पाटील, अमृत अशोक पाटील, योगिता अमृत पाटील, आशाबाई अशोक पाटील,(सर्व. रा.निंभेल, ता.नंदुरबार) व गोविंदा साहेबराव पाटील, संगिताबाई साहेबराव पाटील, बोझिस्तव खंडू पिंपळे (वैदाणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Marathi News Nanduirbar News Corona Lockdown Not Permittion But Marriage And
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..