नोकरी तर नाही, पण हातचे गेले अठरा लाख

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

शहादा येथील आदिवासी पारधी शैक्षणिक मंडळाची शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत मुलाखतीची जाहिरात वाचली. बीए बीएड्‌ असलेल्या पाटील यांच्या नोकरीसाठी सासरे अशोक बच्छाव यांनी संस्थाचालक देविदास मांगु सोनवणे, सचिव राहुल सोनवणे व मेहुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधला

नंदुरबार : नोकरी देण्याचे आमिष दाखवून १८ लाख रुपये उकळणाऱ्या शहादा येथील आदिवासी पारधी शैक्षणिक मंडळाचा तिघां विरोधात शहादा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
होळ (ता. शिंदखेडा) येथील वैशाली शत्रुघ्न पाटील यांनी २८ जून २०१५ ला वृत्तपत्रात शहादा येथील आदिवासी पारधी शैक्षणिक मंडळाची शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत मुलाखतीची जाहिरात वाचली. बीए बीएड्‌ असलेल्या पाटील यांच्या नोकरीसाठी सासरे अशोक बच्छाव यांनी संस्थाचालक देविदास मांगु सोनवणे, सचिव राहुल सोनवणे व मेहुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता नोकरीसाठी १८ लाख रुपयांची मागणी केली. नोकरी मिळणार या अपेक्षेने पैसे भरण्याची तयारी दर्शविली, त्यानंतर पाटील यांच्याकडून हमीपत्र व रुजू अहवाल भरून घेण्यात आला. 

एकरकमी दिले पैसे
१८ लाख रुपये रोख रक्कम संस्थाचालक सोनवणे यांच्या शहादा येथील नागराज नगरमध्ये असलेल्या घरी २८ सप्टेंबर २०१५ ला देण्यात आले. ही रक्कम देताना वैशाली पाटील व त्यांचे सासरे अशोक बच्छाव त्यांच्यासोबत त्यांच्या गावातील अरुण अभिमान पाटील उपस्थित होते. पैसे देऊन देखील मुलाखत घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या सोनवणे यांनी अखेर २६ डिसेंबर २०१६ ला सौ. पाटील यांची नंदुरबार येथील विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलाखत घेत त्याच दिवशी अनुदानित आश्रम शाळा नवागाव (सध्या कुकडेल- शहादा) येथे शिक्षण सेवक नियुक्तीचे जावक क्रमांक १८३/२०१६ अन्वये नियुक्तीपत्र दिले. 

आदेशाची अजूनही वाट पाहताय
पत्र देताना शालेय प्रस्ताव प्रकल्प अधिकारी नंदुरबार येथे पाठविल्यानंतर शाळेत येण्यास सांगण्यात आले. नोकरी पक्की झाली म्हणून संस्थाचालकांच्या आदेशाची सौ. पाटील वाट पाहत असताना आजतागायत नोकरीवर रुजू करून घेण्यात आले नाही. नोकरीवर रुजू करून घेण्याबाबत वारंवार तगादा लावूनही संस्थाचालक सोनवणे यांच्याकडून टाळाटाळ केली जात असल्याने आपली फसवणूक झाल्याचे सौ.पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी पैसे परत मागितले, त्यावर उलट त्यांच्याकडून दमबाजी करण्यात आली. पैसे परत मागाल तर याद राखा, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे वैशाली राहुल पाटील यांनी शहादा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संस्थाचालक देविदास सोनवणे, सचिव राहुल सोनवणे व मेहुल सोनवणे या तिघां विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे पुढील तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar 18 lakh cheated woman for job lure