५३ शिक्षकांना मिळणार पदस्थापना 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत ५३ शिक्षक आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात बदलून आले आहेत. मात्र, त्यांना नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर पदस्थापना दिली नव्हती. त्यामुळे शिक्षक चिंतेत होते.

नंदुरबार : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ५३ शिक्षकांना सहा महिन्यांपासून पदस्थापना मिळाली नव्हती. हे शिक्षक कोणत्या शाळेवर नियुक्ती मिळते, याबाबत प्रतीक्षेत होते. त्यांना अखेर मंगळवारी (ता. २०) जिल्हा परिषदेतर्फे पदस्थापना मिळणार आहे. त्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेने जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पाठपुरावा केला. 
प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत ५३ शिक्षक आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात बदलून आले आहेत. मात्र, त्यांना नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर पदस्थापना दिली नव्हती. त्यामुळे शिक्षक चिंतेत होते. कोरोनामुळे या शिक्षकांचा पदस्थापनेचा प्रश्‍न अधांतरी राहिला होता. शिक्षकांनी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांच्याशी संपर्क साधून समस्या मांडली. त्यावरून श्री. गावित व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, शिक्षण सभापती जयश्री पाटील यांच्याकडे आंतरजिल्हा बदली शिक्षकांना शाळा पदस्थापना देण्यासंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. त्यानंतरही प्रहार शिक्षक संघटनेने वारंवार पाठपुरावा केला. त्यांचा प्रयत्नांना यश मिळाले. 

आंतर जिल्‍हा बदलीने घेतले सामावून
ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून आंतर जिल्हा बदलीने येणारे व जाणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची यादी ऑनलाइन मिळाली असून, शासन स्तरावरून आदेश मिळाले आहेत. यादीनुसार इतर जिल्हा परिषदेतून नंदुरबारमध्ये १२५ शिक्षक प्रवर्गनिहाय आंतर जिल्हा बदलीने सामावून घेतले आहेत. त्या १२५, तर ५३ शिक्षकांना मंगळवारी (ता. २०) सकाळी अकराला होणाऱ्या समुपदेशन शिबिरात पदस्थापना देण्यात येणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar 53 teacher in posting