esakal | केरोसिनच्या कोट्यात ८५ टक्के कपात 
sakal

बोलून बातमी शोधा

Kerosene

जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारींच्या मनमानी कारभारामुळे तालुक्याला आॅगस्टमध्ये केवळ बारा हजार लिटर रॉकेल मिळाले आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला चिमणी पेटवण्यासाठी देखील रॉकेल न मिळाल्याने ऐन पावसाळ्यात अंधारात ठेवण्याचा हा गंभीर प्रकार आहे.

केरोसिनच्या कोट्यात ८५ टक्के कपात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाण्याविहीर (नंदुरबार) : अक्कलकुवा तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांच्या हक्काच्या रॉकेल कोट्यात ८५ टक्के कपात करून प्रशासनाने ऐन पावसाळ्यात त्यांची गैरसोय केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारींनी केवळ हेतूपुरस्करपणे केरोसीन कपात केली असून नियोजनाप्रमाणे रॉकेल साठा उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 

जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारींच्या मनमानी कारभारामुळे तालुक्याला आॅगस्टमध्ये केवळ बारा हजार लिटर रॉकेल मिळाले आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला चिमणी पेटवण्यासाठी देखील रॉकेल न मिळाल्याने ऐन पावसाळ्यात अंधारात ठेवण्याचा हा गंभीर प्रकार आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काचे रॉकेल मंजूर नियतनाप्रमाणे त्वरित उपलब्ध करून द्यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनाही देण्यात आले आहे. 
प्रत्येक पात्र शिधापत्रिकाधारकांच्या वाट्याला केवळ ४०० एम एल एवढेच रॉकेल येत असल्याने ते कोणत्या पद्धतीने वाटप करावे असा प्रश्न उपस्थित करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी वाटप कसे करायचे ते ही सांगावे. अनेक शिधापत्रिकाधारक गॅसपासून वंचित असून त्यांना दैनंदिन जीवनासाठी केरोसीनची गरज असताना केवळ कागदावरच शंभर टक्के गॅस योजनेचा लाभ मिळाल्याचे दाखविले जात आहे. केरोसीन पात्र शिधापत्रिका धारककांचे केरोसीन बंद करण्यात आले आहे. 
 
याची चौकशी व्हावीच 
तालुक्यामध्ये शासकीय योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना गॅस जोडणी मिळाली आहे ? योजनेचा लाभ घेतलेले किती लाभार्थी नियमित गॅस वापरत आहेत? किती लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत ? याबाबत ही चौकशी करण्यात यावी जेणेकरून शासकीय योजनेतून लाभ घेतलेल्या योजना लाभार्थ्यांची खरी आकडेवारी समोर येईल अशी ही मागणीही श्री. पाडवी यांनी केली आहे. 
 
दृष्टीक्षेपात अक्कलकुवा 

शिधापत्रिकाधारक ः ४६ हजार १८६ 
गॅसधारक ः २३ हजार ५६२ 
केरोसिनसाठी पात्र ः २२ हजार ६४०. 
आवश्यक केरोसिन ः ८६ हजार ५६ लिटर 
मिळालेला साठा ः १२ हजार लिटर