पोलिसाची करामत, ब्रेक फेल ट्रक चालवायला लावला आणि स्तंभावर निभावला

धनराज माळी
Friday, 4 September 2020

एक काम चलाऊ चालक पोलिसांना गवसला. ट्रक घेऊन तो पोलिस ठाण्याकडे येत होता. उताराचा भाग असल्याने ट्रकने वेग घेतला.

नंदुरबार ः चौपाळे (ता. नंदुरबार) गावाजवळ ब्रेक फेल झालेल्या ट्रकने एका वाहनाला धडक दिली. तो ट्रक पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी आणत असताना सायंकाळी साडेसहाच्‍या सुमारास शहरातील मुख्य रस्ता व गजबजलेला परिसर असलेल्या स्टेट बॅंक चौकात ब्रेक न लागल्याने चालकाने चौकातील स्तंभाला धडक देत पुढील अनर्थ टाळला. यात एक दुचाकीधारक थोडक्यात बचावला आहे. 

शुक्रवारी सकाळी चौपाळे गावाजवळ दहा चाकी ट्रकने एका वाहनाला धडक दिली. त्यावेळी त्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याचे चालकाने सांगितले. त्यानंतर पुढील सोपस्कार पार पाडून पोलिस तो ट्रक सायंकाळी पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी आणत होते. त्यासाठी एक काम चलाऊ चालक पोलिसांना गवसला. ट्रक घेऊन तो पोलिस ठाण्याकडे येत होता. स्टेट बॅंकेसमोर बरीच वर्दळ होती. हा परिसर उताराचा भाग असल्याने ट्रकने वेग घेतला.

आवश्य वाचा :  विहिर, कुपनलिका तुडुंब तरी कांद्यासाठी शेतकर्‍यांना का करावा लागतो रात्रीचा दिवस  
 

चालकाचे प्रसंगावधान

उतार असल्याने ट्रकचा ब्रेक लागले नसल्याने संबंधित चालकाने वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला त्यावेळी ब्रेक लागत नसल्याचे लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत समोरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला धक्का देत व समोरील चारचाकी वाहनाला वाचवीत स्‍तंभाला ठोकले.

अन पुढील अनर्थ टळला

स्तंभाला ट्रक आदळत असतांना यावेळी एक दुचाकीचालक बालबाल बचावला. ट्रक ठोकल्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिकांनी पळापळ सुरू केली. मात्र ट्रक ठोकल्यामुळे जागेवरच थांबला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान, तत्काळ घटनास्थळी पोलिस दाखल झाले.  

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar accident occurred while driving a brake failure truck in nandurbar city