विहिर, कुपनलिका तुडुंब, तरी शेतकर्‍यांना भल्या पहाटे का यावे लागते शेतात, तर मग वाचा !

जगन्नाथ पाटील
Friday, 4 September 2020

दिवसा सर्वच वीज पंप सुरु होतात. पुर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही. पंप जळण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे सर्वच शेतकर्‍यांना रात्रीच पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

कापडणे  : विहिरी तुडुंब भरल्या आहेत. कुपनलिकेतून विना वीजपंप बाहेर पाणी पडत आहे. मात्र कांदा लागवडीसाठी दोन तीन मक्युरी, मजुरांच्या हातात बॅटरी अन त्यातून झगमगाट केला जात आहे. हा सर्व जुगाड कांदा लावणीसाठी आहे. दिवसा पुरेशी वीज नाही. आहे तर पुर्ण दाबाची नाही. कांदा लागवडीसाठी पहाटे चारपासून महिला मजूर शेतात दाखल होत आहेत. शेतकर्‍यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. राज्यकर्ते दिवसा वीज देत नसल्याने शेतकरी व शेतमजूरांची दैनाच होत आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्यपुर्ण पाऊस झाल्याने श्रावणातील कांदा लागवड रखडली. आता उघडीप दिल्याने पावसाळी कांदा लागवडीस वेग आला आहे.

रात्री अधिक दिवसा कमी मिळते विज
शेतीसाठी एका आठवड्याला रात्री साडे आठ ते सकाळी साडे सहा पर्यंत वीज असते. दुसर्‍या आठवड्याला दिवसा असते. मात्र दिवसा सर्वच वीज पंप सुरु होतात. पुर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही. पंप जळण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे सर्वच शेतकर्‍यांना रात्रीच पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

कांदा लावणीसाठी दिवसाच हवी विज
वाफे तुडुंब भरुनच कांदा लागवड होत असते. चिखलातील लावणीच्या रोपांतून कांद्याचे उत्पादन अधिक होत असल्याचा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. लावणी दिवसा अधिक सोयीस्कर असते. मात्र रात्रीच्या अंधारात चाचपडत लावणी केली जात आहे. लावणीसाठी तरी दिवसाच वीजेची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

हा..! तर शेतकर्‍यांवर अन्यायच
औद्योगिक वीज पुर्ण दाबाने अन चोवीस तास पुरविली जाते. विशिष्ट युनिटपर्यंत वीज मोफतही दिली जाते. मात्र शेतकर्‍यांना निवडणूकीत झुरवत ठेवले जाते. त्यानंतर कोणी ढुंकुनही बघत नाही. हा शेतकर्‍यांवर अन्याय असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

पहाटेची रोजंदारी अधिक
पहाटे दोन तास कांदा लावणीसाठी अधिक मजूरी द्यावी लागत आहे. तेही केवळ दोनच तास लावणी होत आहे. मात्र लावणीचे काम कष्टाचे आहे. दिवसा वीज हवीच.
- भटू गोरख पाटील, माजी सरपंच तथा कांदा उत्पादक शेतकरी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapadne load shedding day, onion growers have to come in the morning to do field work