अंगणवाडी सेविकेचा प्रताप : लाभार्थी कमी अन खर्च दाखविला तिप्पट 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

वीरपूर येथील अंगणवाडी सेविका मायाबाई सामुद्रे यांनी केलेल्या आरोपाबाबत धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सामुद्रे यांनी केलेला आरोप खोटा असून त्यांच्या केंद्रावर संबंधित पर्यवेक्षिकेने प्रत्यक्ष भेट दिली असता आढळलेल्या त्रुटी लपविण्यासाठी पैशांच्या मागणीची तक्रार करण्यात आल्याचे उघड होत आहे

नंदुरबार : अमृत आहार योजनेंर्तगत स्तनदा आणि गरोदार मातांसाठी देण्यात येणाऱ्या पूरक आहाराच्या योजनेची अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुरती वाट लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. या आहाराचे नेमकेपणाने वाटप करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका पार पाडत नसून त्याचा जाब विचारणाऱ्या पर्यवेक्षिकावरच पैसे मागण्याचा आरोप केला जात असल्याचे समोर येत आहे. कन्साई गटातील वीरपूर येथील सेविकेने केलेल्या आरोपांचे प्रकरण गाजत असतानाच या सेविकाच चुकीच्या आणि गंभीर नोंदी करून जादा बिले काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघड होत आहे. 

कन्साई गटातील अंगणवाडी सेविकांनी पर्यवेक्षिका पैसे मागतात असा थेट आरोप करीत शहादा तालुक्यात कुपोषणाबाबत नेमके काय चालले आहे? गरोदर मातांचे कुपोषण आणि बालकांचेही कुपोषण का कमी होत नाही याचा उलगडाच यातून होतो. अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर थेट येणाऱ्या रकमेतून वाटा कसा आणि कुणासाठी काढला जातो हे सेविका सांगत असल्या तरी प्रत्यक्षात फिल्डवर त्यांच्यापैकी काही जणी या साहित्याची कशी अफरातफर करतात याचा पाढाच पर्यवेक्षिकांनी वाचला आहे. 
 . 

लाभार्थी कमीस खर्च मात्र जास्त 
वीरपूरच्या त्या केंद्रावर पर्यवेक्षिकेने केलेल्या पाहणीवेळी लाभार्थी संख्या पन्नास आढळून आली व प्रत्यक्षात अमृत आहार योजनेंतर्गत आहार घेणाऱ्या मातांची संख्या फक्त अकरा होती. प्रत्यक्षात लाभार्थी कमी आणि महिन्याला मासिक खर्चाच्या बिलात लाभार्थी संख्या १२९ ते १३४ दाखविण्यात आली आहे. गरोदर व स्तनदा केवळ २० ते २२ माता उपस्थित होत्या, याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि त्यातूनच पैशच्या मागणीचे आरोप करण्यात आल्याचे समजते. 

एकच माता गरोदर अन स्तनदाही 
विशेष म्हणजे याच केंद्रावर प्रसूती न झालेल्या मातांना अकरा महिन्यापर्यत आहार दिल्याची नोंद आहे तसेच एकाच मातेला गरोदर आणि स्तनदाही दाखविण्यात आलेली आहे. शासनातर्फे आहार शिजविण्यासाठी गॅस देण्यात आलेले आहेत, तो अंगणवाडी केंद्रातच ठेवणे बंधनकारक आहे. मात्र भेटीत गॅस आढळला नाही, म्हणून विचारणा केली असता या सेविकेच्या मुलाने त्याचा स्फोट झाला तर कोण जबाबदार राहील म्हणून तो घरी नेल्याचे धक्कादायक उत्तर पर्यवेक्षिकेला दिले. मोबाईल कॅशमध्ये पाहिले असता संबंधित सेविकेच्या ११ ते २० गृहभेटी बाकी होत्या, याचेही समाधानकारक उत्तर देता आले नाही. 
 
उंचीच्या नोंदीत मोठी तफावत 
वीरपूर केंद्रावर पर्यवेक्षिकेने केलेल्या पाहणीत आॅनलाईन असलेल्या सॅम बालकांच्या यादीनुसार वजन आणि उंचीची नोंद घेतली असता उंचीमध्ये मोठी तफावत आढळून आली, त्यांना वजन आणि उंचीच्या योग्य नोदी करून दुरूस्ती करण्यास सांगितले असता एवढीच कामे आहेत का? असे त्यांनी सांगितले. या साऱ्या त्रुटींबाबत त्यांना विचारणा केली असता त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी खोटे आरोप करून चुकीच्या माहितीच्या आधारे प्रशासन-माध्यमांकडे तक्रार केल्याचे समोर येत आहे. संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी मात्र याकडे डोळेझाक करीत आहेत. सेविकांच्या मनमानीला त्यांचेच तर अभय नाही ना असा प्रश्‍न यातून चर्चिला जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar anagvadi sevika amrut aahar