
हमाल मापाडींची तोलाईच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ करण्यात येते. तीन वर्षाचा करार हा ३१ ऑक्टोबरला संपला होता. १ नोव्हेंबरपासून नवीन दर मिळणे आवश्यक होते. परंतु विविध कारणांमुळे ते होऊ शकले नाही.
नंदुरबार : दर तीन वर्षांनी होणारी हमाल मापाडीचा दरवाढीचा प्रश्न माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मध्यस्थीने सुटत दरात १६ टक्के वाढ करण्यात आली आहे. आगामी तीन वर्षासाठीच ही दरवाढ मान्य करीत हमाल मापाडी प्रतिनिधींकडून एक डिसेंबर पासून बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे.
हमाल मापाडींची तोलाईच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ करण्यात येते. तीन वर्षाचा करार हा ३१ ऑक्टोबरला संपला होता. १ नोव्हेंबरपासून नवीन दर मिळणे आवश्यक होते. परंतु विविध कारणांमुळे ते होऊ शकले नाही. या दरम्यान हमाल- मापाडी यांच्यात बैठकाही झाल्या. मात्र दरवाढीचा निर्णय झालानाही. त्यामुळे गुरुवारी (ता.२६) पासून हमाल मापाडींनी तोलाई व हमालीचे काम बंद केले होते. यामुळे शेतकरी व व्यापारीचा शेतमाल बाजार समितीत उघड्यावर पडून होता. बंदमुळे शेतकरी व व्यापारी देखील चिंतेत होते. याप्रश्नी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हमाल-मापाडींची समजूत काढत दरवाढीबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर गुरूवारी (ता.२६) सकाळी हमाल मापाडींनी शेतकऱ्यांचा माल भरून देण्याची तयारी दाखविली होती. मात्र शुक्रवारी (ता.२७) पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली होती. याच दरम्यान मिरची उत्पादकांचा माल बाजार समितीत पडून राहिल्याने बाजार समिती प्रशासन व पदाधिकाऱ्यांना धारेवर घेतले त्यामुळे यावेळी माजी आमदार रघुवंशी यांच्या मध्यस्थीने शुक्रवारी (ता.२७) व्यापारी प्रतिनिधी, हमाल मापाडी प्रतिनिधी , बाजार समिती संचालक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मिरचीचा लिलाव करून ती मोजून देण्याचे ठरले. त्यानंतर आज (ता.२९) बाजार समितीत शेतकऱ्यांनी माल न आणण्याचे आवाहन बाजार समितीने केल्यानंतर श्री. सूर्यवंशी यांनी यावर मध्यस्थी करत तोडगा काढला.
१६ टक्के दरवाढ
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दरवाढीच्या बैठकीत बाजार समितीचे सभापती दिनेश पाटील , व्यापारी प्रतिनिधी हरेश जैन, महेश जैन, गिरीश जैन, धीरज जैस्वाल, भूपेंद्र जैन, हमाल मापाडी प्रतिनिधी कैलास पाटील ,संतोष पाटील, देवाजी माळी, डॉ.सयाजी मोरे, संचालक रोहिदास राठोड, भरत पाटील, किशोर पाटील, हिरालाल पाटील, सचिव योगेश अमृतकर, राजेंद्र गिरासे आदी उपस्थित होते. श्री. रघुवंशी यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत १६ टक्के दरवाढ पुढील तीन वर्षासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो व्यापारी व हमाल-मापडी प्रतिनिधींनी मान्य केला. त्यामुळे दरवाढीचा प्रश्न सुटला आहे. मंगळवारपासून बाजार समितीचे कामकाज नियमित सुरू होणार आहे.
संपादन ः राजेश सोनवणे