आदर्श शिक्षकांची यादी मंजुरीही लांबणीवर 

धनराज माळी
Friday, 4 September 2020

जिल्ह्यात सहा तालुक्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे सहा शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यासाठी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांची निवड समिती असते.ती समिती जिल्हास्तरावर नावे पाठवितात. यावर्षी सहा शिक्षकांचा निवडीसाठी १३ प्रस्ताव आले आहेत.

नंदुरबार :  जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाला दुःखाची झालर लागली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे नुकतेच निधन झाल्याने शासकीय दुखवटा पाळण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळाही रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे प्रशासनाकडूनही यादीही अंतिम झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात सहा तालुक्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे सहा शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यासाठी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांची निवड समिती असते.ती समिती जिल्हास्तरावर नावे पाठवितात. यावर्षी सहा शिक्षकांचा निवडीसाठी १३ प्रस्ताव आले आहेत. स्थानिक निवड समिती व जिल्हा निवड समितीकडून नावे निश्चित झाले आहेत. ते विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याचे उपशिक्षणाधिकारी डॉ. यूनूस पठाण यांनी सांगितले. ते मंजूर होऊन यादी प्राप्त झाल्यावर ती प्रसिद्ध केली जाणार आहे. उद्या पाच सप्टेंबर तरीही यादीस मंजुरी नाही हे कितपत सत्य आहे. 

पुरस्कार वितरण कार्यक्रम रद्द 
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे राज्याला दुखवटा आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रम घेता येत नाहीत. म्हणून जिल्हा परिषद प्रशासनानेही पुरस्कार वितरण कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे आदर्श शिक्षकांची निवड यादी तयार असूनही ती प्रसिद्ध केली गेलेली नाही. विभागीय आयुक्तांची मंजुरीचे नाव पुढे करत आदर्श शिक्षकांची निवड झालेली नावे माध्यमांना देण्यास टाळाटाळ केली जात आहे. निवड झालेल्या शिक्षकांची नावे घोषित करता येऊ शकतात. केवळ कार्यक्रम घेता येणार नाही. हा प्रोटोकॉल आहे. तरीही निवड झालेल्या शिक्षकांचे नावे जाहीर न करण्या मागचे गौड बंगाल काय ? असा प्रश्न शिक्षकांमधूनच उपस्थित केला जात आहे. 

संपादन : राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar best teacher award no selection teacher