
कुटुंबांतील सदस्यांचे हाल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दोन लाख रुपये रकमेचे विमा संरक्षण दिले जाते.
तळोदा ः गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती शासनाने वाढविली असून आता खातेदार शेतकऱ्यासोबतच त्याचा कुटुंबातील एका सदस्याला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्याला स्वतःशिवाय कोणाला या योजनेचा लाभ द्यायचा आहे, त्याचे नाव नॉमिनीप्रमाणे सुचवावे लागणार आहे. कृषी विभागाने यासंबंधीचा आदेश नुकताच काढला आहे.
अनेकदा शेती करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात होतात तसेच रस्त्यावरील अपघात अथवा वाहन अपघातामध्ये त्यांना जीव गमवावा लागतो. कधी- कधी अपघातात शेतकऱ्यांना कायमचे अपंगत्व देखील येते. कुटुंबातील कमावत्याला अपघात झाल्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधनच बंद होते. पर्यायाने अशा कुटुंबांतील सदस्यांचे हाल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दोन लाख रुपये रकमेचे विमा संरक्षण दिले जात होते.
कोणाला मिळणार लाभ
या योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या कुटुंबातील १०- ७५ या वयोगटातील कोणत्याही एका सदस्याला त्यामध्ये आई- वडील, पती- पत्नी, मुलगा किंवा अविवाहित मुलगी यांपैकी कोणताही एक व्यक्ती शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेऊ शकतो.
विमा काढण्याची गरज नाही
या योजनेसाठी शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कुठल्याही विमा कंपनीचा विमा काढण्याची किंवा हप्ता भरण्याची गरज नसून संपूर्ण रक्कम शासनामार्फत विमा कंपनीकडे भरली जाणार आहे. शेतकऱ्याने अन्य कोणत्याही विमा योजनेचे संरक्षण घेतले असेल तरी त्याच्या या योजनेशी काहीही संबंध नसून या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्रच असतील.
किती मिळणार लाभ
या योजनेअंतर्गत मृत्यू झाल्यास लाभार्थ्याला दोन लाख रुपये अथवा दोघे डोळे किंवा दोघे हात किंवा दोघे पाय अथवा एकाचवेळी एक डोळा, एक हात, एक पाय निकामी झाले, तर दोन लाख रुपये मिळणार आहेत. तसेच एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास लाभार्थ्याला एक लाख रुपये मिळणार आहेत.
कशासाठी मिळणार संरक्षण
वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, रस्त्यावरील अपघात- वाहन अपघात, विजेचा धक्का बसणे, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात आदी बाबींना शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळणार आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे