चिमुकल्‍याने घरी साकारले नंदुरबारचे बसस्‍थानक अन्‌ उभ्‍या केल्‍या बस

धनराज माळी
Monday, 20 July 2020

शहरातील गांधीनगरध्ये राहणाऱ्या प्रथम गुजराथी या विद्यार्थ्यांस शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याचा छंद आहे. कोरोना लॉकडाऊन काळात सुट्यांमुळे घरीच विविध उपक्रम राबविण्यात तो मग्न झाला.

नंदुरबार : कोरोना महामारीमुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक शालेय विद्यार्थ्यांनी सुट्टीचा आनंद लुटला. मात्र नंदुरबार येथील के. आर. पब्लिक स्कूलमधील सहावीतील विद्यार्थी प्रथम प्रशांत गुजराथी या विद्यार्थ्याने नंदुरबार बसस्थानकाची हुबेहूब प्रतिकृती आपल्या चित्रातून साकारली आहे. प्रथमच्या या कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

शहरातील गांधीनगरध्ये राहणाऱ्या प्रथम गुजराथी या विद्यार्थ्यांस शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याचा छंद आहे. कोरोना लॉकडाऊन काळात सुट्यांमुळे घरीच विविध उपक्रम राबविण्यात तो मग्न झाला. प्रथमने आईवडिलांना त्याती संकल्पना सांगितली. वडील प्रशांत गुजराथी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारात वाहतूक नियंत्रक असल्यामुळे प्रथमने नंदुरबार बसस्थानकाची प्रतिकृती बनविण्याचा संकल्प केला. यासाठी वस्तूंची जुळवाजुळव करण्यात आली. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ साहित्य बनविण्यासाठी तब्बल एक ते दीड महिन्याचा कालावधी लागला. प्रथमने सुंदर आणि रेखीव पद्धतीने राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराची प्रतिकृती तयार केली. 
 
प्रतिकृती ठरली लक्षवेधी 
यात बसस्थानकावरील फलाटांप्रमाणे चौकशी कक्ष, प्रवासी बैठक व्यवस्था, फलक, पंखे, खांब, विविध टाकाऊ वस्तू पासून बनविले. याशिवाय फलाटावर लालपरी, परिवर्तन, विठाई, शिवशाही, शिवनेरी, अश्वमेघ, या विविध प्रकारच्या एसटी बसेसच्या प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस नंदुरबार बसस्थानकावरील विद्युत रोषणाई करिता लावलेल्या एलईडी लाइट्स बसस्थानकाच्या सौंदर्यात भर घालतात. लॉकडाऊनमुळे बसस्थानकावर प्रवासी नसल्याने बाके देखील रिकामी दिसून येतात. प्रथमला वडील प्रशांत गुजराथी आणि आई तृप्‍ती गुजराथी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 
 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar bus station drawing home child