सो गया है रस्‍ता...नंदुरबारच्‍या रस्‍त्‍यांवर फक्‍त पोलिसांचे अधिराज्‍य

nandurbar curfew
nandurbar curfew

नंदुरबार : जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी ता. १२ शहरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीला नंदुरबारकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. या संचारबंदीमुळे अत्यावश्‍यक रूग्ण असेल तरच दवाखान्याचा कामासाठी बाहेर पडले, अन्यथा अनेक रूग्णालयेही डॉक्टरांनी बंद ठेवले. त्यामुळे शहरात पूर्णतः सन्नाटा पसरला होता. चौका चौकात केवळ पोलिसांचे अधिराज्य दिसून आले. नंदुरबारकरांनी असेच सहकार्य केल्यास करोनाची साखळी तोडणे सहज शक्य असल्याचा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटल्या. 


जिल्ह्यात करोना रूग्णांचा आकडा जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याची वाटचाल डेंजर झोनच्या दिशेने होऊ लागली आहे. करोनाची स्थिती सर्वांनाच चिंतेत टाकणारी आहे. त्यामुळे नागरिकांबरोबरच जिल्हा प्रशासन, पदाधिकारी व लोकप्रतिनिधीही या करोना संकटाबाबत गंभीर झाले आहे. पालकमंत्री अँड. के.सी.पाडवी यांनी काल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांमध्ये कोणतीही कसर न ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच संचारबंदी नियमांचे उल्लंघन कऱणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना पोलिस विभागाला दिल्या होत्या. वाढत्या करोना संख्येत विशेषतः नंदुरबार शहर सर्वाधिक आघाडीवर आहे. आतापर्यंत करोना बाधितांचा आकडा अडीचशेवर गेला आहे. त्यात शहराचा आकडा दीडशेपर्यंत आहे. हा सर्व संसर्ग केवळ बाहेरून येणाऱ्यांचा संपर्क साखळीमुळे असल्याने त्याची मुख्य नस सापडणे कठीण झाले आहे. 
 
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचे पालन 
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या संचारबंदीच्या आदेशाचे पालन करीत नागरिकांनी बंदला प्रतिसाद दिला. सकाळी नऊपर्यंत वृत्तपत्र विक्रेते व दूध विक्रेत्यांना सूट दिली होती. त्यांनीही आदेशाचे पालन करीत वेळेत कामे आटोपली. सकाळपासूनच शहरातील रस्ते निर्मनुष्य होते. सर्वत्र शुकशुकाट होता. ही परिस्थिती आज दिवसभर जैसे थे होती. रूग्णालये,औषध विक्रेत्यांना संचारबंदीतून वगळण्यात आले होते. तरीही अनेक लहान -मोठे दवाखाने , मेडिकल स्टोअर्स स्वतःहून डॉक्टर व औषध विक्रेत्यांनी बंद ठेवले. त्यातच दवाखान्याचा नावाखाली दरवेळेस बिनधास्त फिरणाऱ्यांना आता दवाखान्याची फाईल सोबत ठेवण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे कोणीही आज दवाखान्याचा नावाखाली विनाकारण फिरतांना आढळून आले नाही. 

शहरातील एंट्री पॉईंटवर पोलिस 
शहरात येणारे व शहराबाहेर जाणाऱ्या एंट्री पॉईंटवरच पोलिस तैनात कऱण्यात आले होते. त्यामुळे शहरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या व्यक्तीस व वाहनांना तेथेच अडवून परत पाठविले जात होते. त्यामुळे शहरात ना माणसांचा वावर दिसला,ना वाहनांचा आवाज कानी पडला. असे चित्र होते. चौका चौकात केवळ पोलिस कर्मचारी बंदोबस्ताला तैनात होते. अधून -मधून फिरणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या आणि पोलिस कर्मचारी हेच सर्वत्र नजरेस पडत होते. 

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com