esakal | सारेच खोकलताय; कारण आहे वातावरण बदलाचे, पण दुर्लख नको
sakal

बोलून बातमी शोधा

cough

ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात वाढलेली रुग्ण संख्या पाहता कोरोनाच्या विळख्यात अजून किती रुग्ण अडकणार आहेत, याचा अंदाज प्रशासनालाही आलेला नाही. सध्या सर्वत्र अलबेल असल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. विनाकारण घराबाहेर पडणे टाळल्यास साखळी तुटू शकते.

सारेच खोकलताय; कारण आहे वातावरण बदलाचे, पण दुर्लख नको

sakal_logo
By
कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे कोरोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या चिंतेत वाढ होत आहे. सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे जाणवू लागले आहेत. त्यामुळे एक अनामिक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. 
ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात वाढलेली रुग्ण संख्या पाहता कोरोनाच्या विळख्यात अजून किती रुग्ण अडकणार आहेत, याचा अंदाज प्रशासनालाही आलेला नाही. सध्या सर्वत्र अलबेल असल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. विनाकारण घराबाहेर पडणे टाळल्यास साखळी तुटू शकते. रुग्ण संख्येला आवर घालण्यासाठी पुन्हा कडक लॉकडाउनची आवश्यकता आहे. 
सध्याची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असूनही विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. शहरात पोलिस कारवाई होऊ शकते, परंतु ग्रामीण भागात मात्र कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई कमी प्रमाणात होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने आणि महसूल विभागाने ग्रामीण भागात गस्त वाढवावी आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

मी निगेटिव्ह आलोय... 
ज्या घरातील व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्याच घरातील इतर कुटुंबीय मात्र बिनधास्त गावातून फिरताना दिसत आहेत. मी टेस्ट केली आहे. मी निगेटिव्ह आहे, मला काय झालंय अशा बतावण्या करत सर्वत्र वावरताना दिसतात. अशा लोकांना दक्षता समितीने समज दिली पाहिजे. 

अंमलबजावणीकडे दुर्लक्ष 
कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना घरातच उपचाराची मुभा देण्यात आली आहे. रुग्णाने किमान काही दिवस विलगीकरण राहणे आवश्यक आहे. मात्र मुभा देऊनही रुग्ण नियम पाळत नाही. परिणामी बाधित रुग्णाविषयी अनेक नागरिक अनभिज्ञ असतात. अनेक वेळा कोरोना बाधित रुग्ण किंवा त्यांच्या निकटचा संपर्कात आलेले व्यक्ती शहरात तसेच गावात फिरत असल्याचेही आढळून येतात. त्यामुळे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे