उघड्यावरील मांसविक्रीकडे दुर्लक्ष 

प्रा. डी. सी. पाटील
Thursday, 6 February 2020

चीनच्या हुनान प्रांतातून कोरोना व्हारयसचे संक्रमण सुरू झाले असून हा व्हायरस आता जगभरात फैलावत आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये ४२५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून वीस हजार लोकांना याचे संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावरील जनजागृती व उपाय योजनांच्या दृष्टीने जागतिक आणीबाणी जाहीर केली आहे. 

शहादा : कोरोना व्हायरसची दहशत जगात सर्वदूर पसरली आहे. यातच आता बर्ड फ्लुही आढळून आला आहे. त्यादृष्टीने राज्यात दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र शहादा शहरात सर्वत्र उघड्यावर मास विक्री सर्रास सुरू आहे. याला प्रतिबंध घालण्यात पालिका अपयशी ठरली आहे. आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षातून नागरिक बळी पडलेत तर याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला जात आहे. 

संबंधीत बातमी - बोरोनाची भीती नाही, पण खबरादारी!

भारतात केंद्र शासनानेही राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. चिन मध्ये कोरोना व्हायरस पाठोपाठ बर्ड फ्ल्युची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचे सूचित करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस कशामुळे संक्रमित होत आहे यावर विविध माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अगोदर ब्रॉयलर कोंबड्यांद्वारे प्रसारीत झाल्याचे सांगण्यात आले. नंतर सी फुड, वटवाघुळ आणि पाळीव प्राण्यांचा उल्लेख करण्यात आला. 

चिनमध्ये या सर्वांवर अन्न म्हणून बंदी घालण्यासह शाकाहारी भोजन घेण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले गेले. व्हायरसची लागण कोणामुळे झाली यावर अद्याप तरी मतेमतांतरे आहेत. त्यावरील उपयुक्त औषधांची माहितीही सोशल मिडीयातून प्रसिद्ध झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात कोरोना व्हायरस पहिल्यांदाच आढळला असल्याचे नमूद करण्यासह त्यावर चिनसह विविध देशातील संशोधक प्रभावी औषध शोधण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत. मात्र देशात व्हायसचा शिरकाव होण्यापूर्वीच त्यावरील प्रभावी देशी औषधांची माहिती सर्रास व्हायरल केली जात आहे. आरोग्य संचालनालयाने यावर तातडीने खुलासा करणे आवश्यक आहे. 

उघड्यावरील मांसविक्री 
राज्य शासनाने कोरोना व्हायरसबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिलेत. मात्र स्थानिक पातळीवर यावर शुकशुकाट आहे. उघड्यावर मास मच्छीची विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित असतांना शहादा शहर व ग्रामीण भागात कोणतीही दक्षता न घेता उघड्यावरच मास मच्छीची विक्री होतांना दिसत आहे. शहरातील मच्छी बाजारासह शहराला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवरील चौकांमध्ये आरोग्य विभागाच्या सौजन्याने अशी विक्री होत आहे. गत पाच दिवसात पालिकेच्या आरोग्य विभागाने दक्षतेच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली नसल्याचे दिसून आले. 

पोल्टींची तपासणी व्हावी 
यदाकदाचित दुर्दैवाने कोरोना व्हायरस किंवा बर्ड फ्ल्युने शारकाव केला तर होणाऱ्या हाहाकाराला कोण जबाबदार राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरीकांमध्ये याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाने जनजागृती करणे अत्यावश्यक ठरले आहे. सध्या शहरालगत सहापैकी चार पोल्ट्री फार्मवर ब्रॉयलर व अन्य कोंबड्या मोठ्या संख्येने आहेत. पशुधन अधिकाऱ्यांनी यांची तपासणी कागदोपत्री न करता प्रत्यक्ष करण्याची आवश्यकता आहे. 

नंदुरबार जिल्हाला लागून दोन राज्यांच्या सीमा आहेत, त्यामुळे दक्षता घेण्यात येत आहेत. सर्व आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तापाचे संशयित रूग्ण आढळल्यास तातडीने तपासणी आणि उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्याबाबत कळविले आहे. स्वाईन फ्ल्यूवरील उपचारासाठी कक्ष सज्ज ठेवण्यात आलेला आहे. 
-डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक,नंदुरबार. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar chickane open shop korona virus