"कोरोना'ची भीती नाही; पण खबरदारी! 

dhule corporation
dhule corporation

धुळे :चीनमधील "कोरोना' विषाणूची लागण झालेले काही रुग्ण भारतातील काही राज्यांमध्ये आढळल्याने शासनाने आरोग्य यंत्रणेला खबरदारीसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी आज आरोग्य विभागाची बैठक घेतली. "कोरोना'च्या अनुषंगाने महापालिका उद्यापासून (ता. 6) जनजागृतीवर भर देईल. दरम्यान, यासंदर्भात उद्या खासगी डॉक्‍टरांचीही बैठक बोलावण्यात आली आहे. 

राज्यात "कोरोना'चा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता कमी असली तरी खबरदारी म्हणून शासनाने सर्व आरोग्य यंत्रणांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने आयुक्त अजीज शेख यांनी आज सकाळी महापालिकेत आरोग्य विभागाची बैठक घेतली. सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, तसेच कुणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास काय खबरदारी घ्यावी याअनुषंगाने महापालिकेतर्फे उद्यापासूनच जनजागृती होईल. होर्डिंग्ज लावणे, हॅण्डबिल वाटप, ध्वनिक्षेपकचा वापर करणार असल्याचे आयुक्त शेख यांनी सांगितले. 
 
डॉक्‍टरांसाठीही दक्षता 
खबरदारी म्हणून मनपा दवाखान्यातील सर्व डॉक्‍टरांना मास्क, लिक्विड सॅनिटायझर, हॅण्डग्ग्लोज आदी साहित्य पुरविण्यात येणार आहे. कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात व्यवस्था असेल. 

खासगी डॉक्‍टरांची बैठक 
कोरोनाच्या रुग्णांची लवकरात लवकर ओळख व्हावी व त्यादृष्टीने पुढील उपाययोजना करणे सोईस्कर व्हावे यासाठी खासगी दवाखान्यात आढळलेल्या संशयित रुग्णांची माहिती तत्काळ आरोग्याधिकाऱ्यांना द्यावी, अशा सूचना खासगी डॉक्‍टरांना देण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेत उद्या "आयएमए', निमा या खासगी वैद्यकीय संघटनांची बैठक आहे. 

सर्वसामान्य लक्षणे अशी 
सर्दी, खोकला (कॉमन कोल्ड), गंभीर स्वरूपाची श्‍वसन संस्थेची लक्षणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे, श्‍वासास अडथळा येणे, न्यूमोनिया, पचनसंस्थेची लक्षणे- अतिसार, काही रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे, प्रतिकार शक्तीची कमतरता असलेल्या व्यक्‍तींमध्ये असामान्य लक्षणे आढळू शकतात. 
 
प्रतिबंधात्मक खबरदारी 
श्‍वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तीशी निकट सहवास टाळणे, हातांची नियमित स्वच्छता, न शिजवलेले अथवा अपूर्ण शिजवलेले मांस खाऊ नये, फळे व भाज्या न धुता खाऊ नये, खोकताना अथवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल/टिश्‍यू पेपर लावावा, वापरलेला टिश्‍यूपेपर झाकण असलेल्या डस्टबीनमध्ये टाकावा. 

यांनी घ्यावा तत्काळ सल्ला 
श्‍वसनाचा त्रास होणाऱ्या व्यक्ती, कोणत्या आजारामुळे त्रास होत आहे हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने नुकताच मध्यपूर्वेचा प्रवास केला असल्यास, प्रतिकारशक्‍ती कमी असलेल्या आजारी व्यक्ती तसेच ज्यांनी नुकताच नवीन करोना विषाणुबाधित देशात प्रवास केला आहे अशा व्यक्ती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com