नंदुरबार शहरातील सात मुख्य रस्ते ‘सील’ 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

खासगी रुग्णालयात उपचार घेताना ८० वर्षीय महिलेचा तपासणी अहवाल ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आला होता. तिची प्रकृती गंभीर होती. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

नंदुरबार : शहरातील अहिल्याबाई विहीर परिसरातील ‘कोरोना’बाधित ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या परिसराकडे जाणारे सात रस्ते ‘सील’ करण्यात आले आहेत, तसेच महिलेच्या संपर्कातील २१ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

शहरातील ‘कोरोना पॉझिटिव्ह’चा आकडा वाढतो आहे. आजअखेर ‘कोरोना पॉझिटिव्ह’ची संख्या २१ झाली आहे. शुक्रवारी (ता. ८) एका खासगी रुग्णालयात उपचार घेताना ८० वर्षीय महिलेचा तपासणी अहवाल ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आला होता. तिची प्रकृती गंभीर होती. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाला ही बाब कळताच संबंधित हॉस्पिटलसह महिला राहत असलेला परिसर ‘सील’ करण्यात आला. शुक्रवारी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन तासांतच संबंधित महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे तत्काळ जिल्हा प्रशासनाने त्या परिसराकडे जाणारे रस्ते ‘सील’ केले. 

सात रस्त्यांवर बॅरिकेट्स 
अहिल्याबाई विहीर परिसराकडे जाणारा हाटदरवाजा ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर हस्ती बँकेजवळ व गणपती मंदिराजवळ घी बाजाराकडे जाणारा मुख्य रस्ता, माणिक चौकात भगवती स्टोअर्ससमोर, तर सोनार खुंटजवळ भक्तवत्सल सोनार यांच्या घराजवळ तसेच जुना बैल बाजार परिसरातून बालाजीवाड्याकडे येणारा रस्ता आदी ठिकाणी बॅरिकेटस लावून परिसर ‘सील’ करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी स्वतःच होम क्वारंटाइन केल्यागत स्थिती आहे. परिसरातून कोणीही बाहेर पडत नसल्याने शुकशुकाट आहे. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

दोन वेळा निर्जंतुकीकरण 
अहिल्याबाई विहीर परिसरात पालिकेतर्फे शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी, रात्री तसेच आज सकाळी व सायंकाळी निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी करण्यात आली. हा परिसर पूर्णतः निर्जंतुकीकरण करण्यात आला. 

२१ जण क्वारंटाइन 
अहिल्याबाई विहीर परिसरातील मृत ८० वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या २१ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे, तसेच परिसरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

एकाचे दोन अहवाल ‘पॉझिटिव्ह’ 
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा दुसरा अहवालही प्रशासनाला नुकताच प्राप्त झाला आहे. तो अहवालही ‘पॉझिटिव्ह’ आल्याचे प्रशासनाने सांगितले. त्या रुग्णाची विशेष काळजी घेऊन उपचार सुरू आहेत. 

‘स्वॅब’ तपासणी अहवाल 
- आयसोलेशन वॉर्ड - १३३ 
- जनरल क्वारंटाइन - ४१८ 
- होम क्वारंटाइन - ४० 
- हॉस्पिटल स्टाफ ‘स्वॅब’ तपासणी - १३० 
- आतापर्यंत ‘स्वॅब’ नमुने तपासणी - ७३० 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar city sevan main road sill corona virus