esakal | नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा अभाव 
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar civil hospital

इंजेक्शनची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी, त्यांचे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन महाग असून, सर्वसामान्य गरीब रुग्णांना बाहेरून इंजेक्शन विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने जिल्हा प्रशासनाने त्याची व्यवस्था तातडीने करणे गरजेचे आहे.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा अभाव 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांची अवस्था अत्यंत वाईट असून, योग्य उपचाराअभावी बहुतांश रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. जिल्ह्यात त्याची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले, तरी रुग्णालयाकडून मात्र टंचाईचे कारण सांगितले जात आहे, पालकमंत्र्यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे, असा आरोप भाजपने केला आहे. 
इंजेक्शनची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी, त्यांचे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन महाग असून, सर्वसामान्य गरीब रुग्णांना बाहेरून इंजेक्शन विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने जिल्हा प्रशासनाने त्याची व्यवस्था तातडीने करणे गरजेचे आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राला कोरोना रुग्णांसाठी मोठा निधी दिला आहे. याशिवाय राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहायता निधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य केले आहे. दुर्दैवाने घरात बसून असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रियमुळे कोविड रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

पालकमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडल्‍याचा आरोप
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री के. सी. पाडवी यांनीही जिल्ह्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, ही बाब अतिशय गंभीर असून, अशीच परिस्थिती राहिल्यास भारतीय जनता पक्ष जिल्हयात तीव्र आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, जिल्हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी व पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे