काँग्रेसचा गाडा वर्षभरापासून चालतोय जिल्हाध्यक्षांविना 

धनराज माळी
Sunday, 22 November 2020

वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीच्यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी थेट ॲड. के. सी. पाडवी यांच्यावरच येऊन पडली होती.

नंदुरबार : वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे. वर्ष उलटूनही अद्याप जिल्हाध्यक्षपदाची निवड झालेली नाही. अनेक जण इच्छुक आहेत. मात्र निवडीसाठी मुहूर्तच गवसेना, अशी परिस्थिती आहे. महिनाभरापूर्वी पालकमंत्र्यांनी जिल्हा उपाध्यक्षांसह तर पदांची नियुक्ती केली. मात्र जिल्हाध्यक्षांविनाच पक्षाचा गाडा सुरू आहे. 

पालकमंत्र्यांकडेच धुरा 
वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीच्यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी थेट ॲड. के. सी. पाडवी यांच्यावरच येऊन पडली होती. स्वतः विधानसभेचे उमेदवार असताना जिल्हापक्षीय जबाबदारी त्यांच्यावर आल्याने त्यांना चांगलीच कसरत करावी लागली. स्वतःचा प्रचार, जिल्ह्यातील इतर उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन, नेत्यांच्या सभा, त्यातच राज्य व जिल्हा परिषद, पंचायत समितींमधील सत्तेचा खेळ, या सर्व गोष्टींना सामोरे जात पाडवी यांनी पक्षीय नेतृत्वाची धुरा सांभाळली. त्या वेळी त्यांना कार्याध्यक्ष दिलीप नाईक, माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, अभिजित पाटील यांची खंबीर साथ लाभली. 

जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक 
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक निष्ठावान कार्यकर्ते इच्छुक आहेत. मात्र तरीही जिल्हाध्यक्षांची निवड होत नाही. त्यामुळे इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे, असे असले तरी जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीला मुहूर्त गवसत नसल्याचीच चर्चा कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. 

जिल्हाध्यक्षपद इतर समाजाला मिळावे 
आत्तापर्यंत अनेक वर्षांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रघुवंशी कुटुंबीयांकडे होते. म्हणजेच बिगरआदिवासी समाजाकडे होते. जिल्ह्यात इतर राजकीय पदे व जागा या आरक्षित व विशेषतः अनुसूचित जमातीसाठी असल्याने पक्षात इतर समाजालाही पदे मिळावीत म्हणून हा फॉर्म्युला पक्षश्रेष्ठींनी वापरून इतर समाजाला पक्षाशी जोडून ठेवले आहे. तोच फॉर्म्युला यापुढेही सुरू ठेवावा, असा मतप्रवाह काँग्रेसमधील इतर समाजातील कार्यकर्त्यांचा आहे. मात्र सध्या जिल्हा कार्यकारिणीत असलेले काही पदाधिकारीच जिल्हाध्यक्षपदासाठी प्रयत्नशील असल्याने इतर समाजातील कार्यकर्ते दबक्या आवाजात नाराजी व्यक्त करत आहेत. 

कार्यालयाचे आज उद्‌घाटन 
काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचे रविवारी (ता.२२) दुपारी दोनला पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. आजपर्यंत काँग्रेसचे कार्यालयच नव्हते. यापूर्वी काँग्रेसची धुरा रघुवंशी कुटुंबीयांकडे होती. त्यामुळे त्यांचा आमदार कार्यालयातूनच पक्षाचे कामकाज सुरू होते. मात्र माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी वर्षभरापूर्वी काँग्रेस सोडली तेव्हापासून पक्षाचे कामकाज पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी व कायार्ध्यक्ष दिलीप नाईक यांच्या निवासस्थानावरून सुरू होते. मात्र, दोन्ही नेत्यांची निवासस्थाने कार्यकर्त्यांच्या दृष्टीने दूर होती. आता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नेहरू चौकात जिल्हा कार्यालय सुरू होत आहे. उद्‌घाटनानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, दिलीप नाईक आदी उपस्थित असतील. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar congress no district president last one year