संततधार पावसाने लावली किड; कापसावर ‘मर’ रोगाचे आक्रमण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

काही ठिकाणी जास्त पावसामुळे कापूस, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाल्याचे कळले आहे. कर्मचाऱ्यांना याबाबतीत लक्ष केंद्रीत करण्याचा सूचना दिल्या असून लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- नरेंद्र महाले, तालुका कृषी अधिकारी, तळोदा.

तळोदा (नंदुरबार) ः तळोदा शहरासह तालुक्यातील अनेक लहान- मोठ्या गावांमध्ये गेल्या वीस- पंचवीस दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. पावसाने बळीराजा जरी सुखावला असला तरी संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खरीप पिकाचे नुकसान झालेले दिसून येत आहे. उडीद, मुगाचे नुकसान झाल्‍यानंतर आता कापसावर मर रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

तळोदा तालुक्यात जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या होत्या; परंतु त्या पिकांसाठी पुरेशा नव्हत्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण होते. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावत सर्व कसर भरुन काढली. गेल्या २५ दिवसांपासून तळोदा तालुक्यातील अनेक लहान- मोठ्या गावांबरोबरच सातपुड्याच्या दुर्गम भागात देखील पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी शहरासह तालुक्यातील रांझणी, रोझवा, रोझवा पुनर्वसन, मोड आदी गावांबरोबरच सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक पाड्यामधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

कापसावर मर रोग
कापसावर मावा, तुडतुडे बरोबरच आता मर रोग देखील पडला आहे. या रोगामुळे ठिकठिकाणी कापसाची झाडे कोमेजून जाऊन झाडे कोलमडून पडल्याचे प्रकार घडत आहेत. तसेच शेतात पावसाचे पाणी घुसल्याने कापसाची झाड वाहून जाण्याचे प्रकारही काही ठिकाणी घडले आहेत. सततच्या पावसामुळे मूग, उडीद या पिकांच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले आहेत. तर ज्वारी पिकाची पाने पिवळी पडून, सडून गळून पडत असल्याचे दिसून येत आहे. पावसाने उघडीप न दिल्यास सोयाबीन पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात, चिंतेत भर पडली असून शासन, प्रशासनाने वेळीच दखल घेत त्वरीत पंचनामे करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकाऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

जवळपास गेल्या २५ दिवसांपासून संततधार पाऊस होत आहे त्यामुळे मावा, तुडतुडे बरोबरच आता कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कापसाची लागवड केलेले शेतकरी हैराण झाले असून उत्पन्नात घट येत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- विजयसिंग राजपूत, शेतकरी, चिनोदा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar continue rain last 25 days cotton mar virus