गणेशोत्सवाची उलाढाल मंदावली 

धनराज माळी
Tuesday, 28 July 2020

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यंदाच्या गणेशोत्‍सवावर कोरोनाचे सावट राहणार असल्याने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती मूर्ती दोन फूट व सार्वजनिक मंडळाची मूर्ती चार फुटांपेक्षा मोठी नसावी.

नंदुरबार : राज्यात नंदुरबारचा गणेशोत्सव ओळखला जातो तो गोतावळ्यांच्या गणपतींमुळे. गणेशोत्सव म्हटला म्हणजे नंदुरबारमध्ये उत्साहाला उधाण येते. नंदुरबारातील दादा, बाबा, मामा गणपतींचा गोतावळा राज्यात ओळखला जातो. तसेच नंदुरबारातील गणेशमूर्तींना राज्यासह परराज्यांतही मागणी असते. परंतु यंदा कोरोनाने सर्वच सण-उत्सवांच्या आनंदावर विरजण घातले असल्याने याला गणेशोत्सवही अपवाद कसा राहणार. गणेशोत्सवाभोवती असलेली आर्थिक उलाढाल मंदावली आहे. त्याचा फटका मूर्तिकार, मंडप व्यावसायिक, गुलाल व्यावसायिक, तसेच तत्सम उद्योगांना बसत आहे. 
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यंदाच्या गणेशोत्‍सवावर कोरोनाचे सावट राहणार असल्याने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती मूर्ती दोन फूट व सार्वजनिक मंडळाची मूर्ती चार फुटांपेक्षा मोठी नसावी. त्यासोबतच नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे. गणेशोत्सवासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी जिल्हावासीयांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून, गणेश मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार असल्याचे सांगितले आहे. आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे व कुटुंबीयांचे कोरोना विषाणूपासून रक्षण करावे, असे आवाहन केले आहे. 

...अशा आहेत मार्गदर्शक सूचना 
- न्यायालयाने आदेश निर्गमित केले आहेत. मंडपांबाबत धोरणाचे पालन करावे 
- घरगुती, तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी 
- या वर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर मूर्तींचे पूजन करा 
- मूर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करा 
- विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे 
- सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्यविषयी उपक्रम/शिबिरे आयोजित करावे 
- श्रीगणेश दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुकद्वारे उपलब्ध करावी 
 

संपादन : राजेश सोनवणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona impact in ganesh festival