नंदुरबारच्या उंबरठ्यावर येऊन पोचला कोरोना 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

स्थानिक प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन गावात संचारबंदी केली असून उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशनाचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे. 

ब्राम्हणपुरी  : मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथे कोरोना आजाराचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बडवानी जिल्ह्यातील एकूण ११ स्वॅब नमुने परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते. यातील चौघांचे रिपोर्ट शनिवारी रात्री मिळाले होते. त्यात सेंधवा येथील तिघांचे पॉझिटिव्ह तर एकाचा निगेटिव्ह आला होता. यात एक ७५ वर्षीय वृद्धा, ४० वर्षीय महिला आणि १३ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या तिघांना इंदूर येथील आयसोलेशन कक्षात हलवण्यात आले आहे. या तिघा बधितांच्या संपर्कात कोण कोण आले असावे त्याचा शोध सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन गावात संचारबंदी केली असून उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशनाचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे. 

महाराष्ट्राच्या हद्दीतून गावागावांतील अनेकांचा संपर्क हा सेंधवा, खेतिया या मध्यप्रदेशातील विविध भागात येतो. यामुळे शहादा तालुका व सीमावर्ती भागात चिंता व्यक्त होत आहे. सध्या दोन्ही राज्याच्या सीमेवर कडकडीत बंद असून काही समाजकंटक चोरट्यांमार्गाने ये-जा करताना दिसून येत आहेत. याला सक्तीने हाताळावे असे नागरिकांचे मत व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवरील खेडदिगर येथील सीमा पूर्णतः बंद करण्यात आली असून नियमाचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कार्य असल्या शिवाय घरातून निघू नये. 
- किरण पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक, म्हसावद. 

गरजू, गरीबांना मोफत जेवण देण्यात येत असून गावच्या संरक्षणासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावात स्वच्छतेची सर्व कामे पूर्ण करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. 
- अनिरुद्ध मुसळदे, सरपंच खेडदिगर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Corona reached the threshold of Nandurbar