esakal | बारा हजारावर स्वॅब तपासणी अन्‌ साडेतीन हजारावर पॉझिटीव्‍ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus

सुरूवातीला आरोग्य विभागाकडून स्वॅब घेतले जात होते मात्र नागरिक पुढे येत नव्हते. त्यातच तापसणीसाठी धुळे येथे पाठवावे लागत होते. आता सर्वसोयींयुक्त स्वॅब तपासणी लॅब उपलब्ध झाल्याने दररोजचे तपासणी अहवाल निकाली काढले जातात. नागरिक आता स्वतःहून स्वॅब तपासणीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे प्रमाणही वाढले आहे. त्यातून पॉझिटिव्हची संख्याही पुढे येत आहेत. तेच रूग्ण बरे होऊन घरी जाणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. 
- डॉ. कांतराव सातपुते, निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.

बारा हजारावर स्वॅब तपासणी अन्‌ साडेतीन हजारावर पॉझिटीव्‍ह 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : कोरोनाबाबत भिती असली तरी नागरिकांत जागरूकताही वाढत असून जिल्ह्यात स्वॅब तपासणीला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पाच महिन्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. स्वॅब तपासणी लॅबही नव्हती, मात्र आता स्थानिक लॅब सुरू झाली, असून नागरिक स्वतःहून तपासणीसाठी पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा गेल्या महिनाभरातच सर्वाधिक वाढला आहे. त्या सोबतच रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. 

कोरोनावर जिल्ह्यात उपाययोजनांसाठी प्रशासन तसेच आरोग्य विभागाने अहोरात्र काम केल्याने प्रमाण आटोक्यात राहिले होते. नागरिकांमध्ये जागृतीऐवजी भितीच जास्त होती. भितीपोटी नागरिक स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बाहेर पडणार नाही, गर्दी होणार नाही, संसर्ग साखळी वाढणार नाही, हा उद्देश त्यामागचा असला तरी नागरिकांनी शासन-प्रशासनाच्या नियमांचेही पालन तंतोतंत केले. त्यात घरात बसून राहणाऱ्या व्यक्तीलाही कोरोना संसर्ग झाल्याचे स्वॅब तपासणी पुढे आले. नागरिक उपाययोजनांसोबतच नियमांचेही बऱ्यापैकी पालन केले आहे. लॉकडाऊन शिथिल केले. कोरोनाची भिती कमी होत स्वॅब तपासणीला नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत. लक्षणे दिसल्यास नागरिक स्वतःहून आता रूग्णालयांमध्ये जाऊन तपासणी करून घेऊ लागले आहेत. 

लॅबसाठी कमर्चाऱ्यांचा तुटवडा 
नागरिकांमध्ये जाणीव जागृती वाढली. संस्था, संघटना पुढे येत स्वॅब शिबिराचे आयोजन करू लागले आहेत. त्यातच जिल्हा रूग्णालयात स्वॅब तपासणी लॅब मिळाली. त्यामुळे अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण घटले आहे. त्यातून दररोज पॉझिटिव्हचे आकडे वाढतांना दिसत आहेत. ज्या वेगाने पॉझिटिव्हचे आकडे वाढताहेत त्याच वेगाने रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या दोन दिवसात साधरण तीनशे रूग्ण बरे होऊन घरी परतले. हे सारे करत असतांना जिल्हा रूग्णालय प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोविडसाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवूनही कर्मचारी व डॉक्टर मिळेना अशी स्थिती आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर जास्तीचा ताण पडत आहे. 

 
 
दृष्टीक्षेपात 
एकूण घेतलेले स्वॅब-१२,४२१ 
एकूण पॉझिटिव्ह- ३६१९ 
उपचार सुरू असलेले-११३२ 
मृत्यू संख्या -९४ 
बरे झालेले रूग्ण -२३८७