नंदुरबार जिल्‍ह्यात मृत्यूदर निम्‍म्याने घटला 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

जिल्ह्यात २ हजार ८३३ बाधितांपैकी १ हजार ७०६ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १०४४ रुग्णांवर उपचार सुरू आहे, तर ७८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. स्वॅब चाचणी वाढल्याने मृत्यू दरातही सुधारणा होत आहे.

नंदुरबार : कोरोना बाधिताना वेळेवर उपचार मिळावे यासाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत असून आज दिवसभरात ३०८ बाधित उपचाराअंती बरे होऊन घरी परतले. बुधवारी देखील १२३ कारोनामुक्त झालेल्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते. 

जिल्ह्यात २ हजार ८३३ बाधितांपैकी १ हजार ७०६ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १०४४ रुग्णांवर उपचार सुरू आहे, तर ७८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. स्वॅब चाचणी वाढल्याने मृत्यू दरातही सुधारणा होत आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा होऊन तो ६० टक्क्यापर्यंत पोहोचला असून मृत्यू दर ५.५ टक्क्यावरून २.८ टक्क्यावर आला आहे. यात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रशासन स्तरावर करण्यात येत आहे. 

चाचण्यांचे प्रमाण वाढविले 
कोरोना आजाराची लक्षणे जाणवल्यास त्वरित स्वॅब घेऊन चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. स्वॅब चाचण्यांची संख्या १० हजारावर पोहोचली आहे. त्यासाठी तालुका स्तरावर मोबाईल टीम नेमण्यात आल्या आहेत. तीव्र लक्षणे असणाऱ्यांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रॅपीड अँन्टीजन टेस्टची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. नंदुरबार येथेच लॅब सुरू झाल्याने वेळेवर उपचार करणे शक्य झाले आहे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल नंदुरबार, शहादा, नवापूर आणि सलसाडी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार करण्यात येत आहे. नंदुरबार आणि नवापूर येथे प्रत्‍येकी दोन खाजगी रुग्णालयात देखील शासनाने निश्चित केलेल्या शुल्क नुसार कोविड बाधितांवर उपचाराची सुविधा आहे. प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. आजाराची लक्षणे आढळताच त्वरित स्वॅब चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus Mortality dropped by half