नंदुरबार जिल्ह्यात ‘कोरोना’चा विस्फोट; संख्या १०७ पर्यंत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

नंदुरबार येथील सिंधी कॉलनीतील सात दिवसापूर्वी पॉझिटिव्ह निघालेल्या ६७ वर्षीय वृद्धाचा काल दुपारी मृत्यू झाल्याची वार्ता आल्यानंतर शहरवासियांना धक्का बसला. त्यातून सावरेपर्यत सायंकाळी सहाला आलेल्या अहवालात एकदम १८ रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली.

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून ‘कोरोना’ बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे. गेल्या दहा दिवसात रुग्णांची संख्या वाढत तिने शंभरी पार करत १०७ पर्यंत मजल मारली आहे. काल नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील दहा व तळोदा शहरातील पाच आणि मोलगी (ता. अक्कलकुवा) येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे. यामुळे रुग्णांवर उपचार करणारे जिल्हा रुग्णालयच कोरोनाच्या विळख्यात सापडते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आरोग्य प्रशासनाने रुग्णालयातील सर्व स्टॉफची प्राधान्याने काळजी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 
नंदुरबार येथील सिंधी कॉलनीतील सात दिवसापूर्वी पॉझिटिव्ह निघालेल्या ६७ वर्षीय वृद्धाचा काल दुपारी मृत्यू झाल्याची वार्ता आल्यानंतर शहरवासियांना धक्का बसला. त्यातून सावरेपर्यत सायंकाळी सहाला आलेल्या अहवालात एकदम १८ रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली. या पंधरा रुग्णात दहा जण जिल्हा रुग्णालयातील वर्ग चारचे कर्मचारी आहेत. यामुळे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दाखल कक्षातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बाधा झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालयच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. एकाच दिवशी एवढ्यामोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहराची ग्रीन झोनकडे वाटचाल होऊ शकते, ही आशा तूर्तास मावळली आहे. ग्रामस्थांसह सगळ्यांनीच कोरोना प्रतिबंधक नियमांचे कठोरपणे पालन करण्याची वेळ आली आहे. 

त्या मृताचा अहवाल निगेटिव्ह 
नंदुरबार शहरातील एक ५० वर्षीय पुरुषावर संशयित म्हणून उपचार सुरू होते. त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र अहवाल येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मात्र २३ जूनला रात्री आलेल्या अहवालानुसार या संशयित मृत पुरुषाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे. 

५२ जण ‘कोरोना’मुक्त 
जिल्हा रुग्णालयातील दहा कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाचा परिसर तातडीने निर्जंतुकीकरण केला. तळोदा येथील मोठा माळीवाडा, खानदेश गल्ली, भोईगल्ली परिसरात बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. दरम्यान कोरोना बाधीतांची संख्या १०७ वर पोहोचली असली तरी त्यातील ५२ जण कोरोनामुक्त झाले आहे. पाच जणांचा मृत्यू झाला आहे व १४१ अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने नियमांचे पालन कठोरपणे स्वतःच्या आरोग्यासाठी करण्याची वेळ आलेली आहे. 

संपर्कातील व्यक्तींचा शोध 
काल एकाच दिवशी आढळलेल्या १८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णात तळोदा येथील ३३, २९ (मोठा माळीवाडा) ५४, ५१ (खान्देशीगल्ली), ४५ (भोई गल्ली) वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयातील ४१ व ३१ वर्षीय स्त्री तसेच ३०, २९, ३०, ३२ वर्षीय पुरुषांचा तसेच मोलगी (ता. अक्कलकुवा) येथील ४० वर्षीय पुरुष व सात वर्षीय बालिका, भोणे (ता. नंदुरबार) येथील ४३ वर्षीय पुरुष आणि जिल्हा रुग्णालयातील ३१ व २९ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. मौजे भोणे येथे नवीन कन्टेनमेंट झोन तयार करण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कातील चार व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus new 18 case detect one day